भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:34 AM2018-11-27T00:34:44+5:302018-11-27T00:35:02+5:30
इतर जिल्ह्यांत महावितरणने शिकाऊ वीजतंत्री व तारतंत्री भरतीत स्थानिकांना प्राधान्य दिले. हिंगोलीत मात्र जाणीवपूर्वक डावलले जात आहे. त्यामुळे याबाबत उत्तर न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा तांत्रिक अॅप्रेंटीस असोसिएशन या संघटनेकडून देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : इतर जिल्ह्यांत महावितरणने शिकाऊ वीजतंत्री व तारतंत्री भरतीत स्थानिकांना प्राधान्य दिले. हिंगोलीत मात्र जाणीवपूर्वक डावलले जात आहे. त्यामुळे याबाबत उत्तर न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा तांत्रिक अॅप्रेंटीस असोसिएशन या संघटनेकडून देण्यात आला.
राज्यभर वीजतंत्री व तारतंत्री याची पदभरती होत आहे. इतर ठिकाणी महावितरणने स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जास्त गुण असतानाही हिंगोली जिल्ह्यातील उमेदवार डावलले गेले. आता हिंगोली जिल्ह्यात भरती करताना मात्र महावितरण सरसकट उमेदवारांचा विचार करीत आहे. त्यामुळे स्थानिक आयटीआय केलेल्या उमेदवारांमध्ये असंतोषाची भावना आहे. परजिल्ह्यात संधी मिळणार नाही आणि स्वजिल्ह्यातही परजिल्ह्यातील उमेदवारांशी स्पर्धा करावी लागणार असेल तर महावितरणने आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली. जर स्थानिक उमेदवारांनाच यात प्राधान्य दिले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद स्वामी, माजी पं.स. सभापती दिलीप घुगे आदींच्या नेतृत्वात भरतीतील स्थानिक उमेदवारांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकाºयांसह इतरांनाही निवेदन देण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून हा मुद्दा गाजत आहे. उमेदवार दुसºया जिल्ह्यात झालेल्या भरतीच्या याद्या दाखवत आहेत. मात्र स्थानिक अधिकारी त्यांना दाद देत नसल्याचे चित्र आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी वरिष्ठ अधिकारीही उपलब्ध होत नसल्याने उमेदवारांमध्ये संताप आहे. आजही या उमेदवारांना कोणतेच ठोस आश्वासन मिळाले नाही. बेरोजगारांचा जाणीवपूर्वक छळ करण्याची भूमिका अधिकारी घेत असल्याचा आरोप केला जात होता. याबाबत काही लोकप्रतिनिधीनींही सूचना दिल्या. मात्र महावितरण बधत नसल्याचे चित्र आहे.