खासगी वाहिन्या, एफ. एम. रेडिओवरील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:30 AM2021-07-29T04:30:06+5:302021-07-29T04:30:06+5:30
आक्षेपार्ह प्रसारणावर राहणार नियंत्रण हिंगोली : खासगी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि एफ. एम. रेडिओ केंद्रे तसेच कम्युनिटी रेडिओ ...
आक्षेपार्ह प्रसारणावर राहणार नियंत्रण
हिंगोली : खासगी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि एफ. एम. रेडिओ केंद्रे तसेच कम्युनिटी रेडिओ केंद्रावरुन होणाऱ्या सामुग्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केबल टेलिव्हिजन नेटवर्क (विनियमन) अधिनियम १९९५ नुसार जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची स्थापन करण्यात आली आहे.
या समितीची बैठक २८ जुलै निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत सर्व खासगी वाहिन्यांनी केबल टेलिव्हिजन नेटवर्क (विनियमन) अधिनियम १९९५ चे पालन करणे बंधनकारक असून, या कायद्यानुसार सर्व नोंदणीकृत खासगी वाहिन्यांनी फ्री टू एअर वाहिन्या आणि दूरदर्शन वाहिन्यांचे प्रक्षेपण करणे बंधनकारक आहे. जाहिरात संहितेचे कार्यक्रमाच्या प्रसारणात उल्लंघन करणे, विविध धर्म, जाती, भाषा, वर्ग, समूह आणि समाजाच्या भावना दुखविणारे किंवा समाजात द्वेषभावना पसरविणारे प्रसारण करणाऱ्यांविरुद्ध चौकशी करून कारवाई करण्याचे अधिकार या समितीला असणार आहेत. अशा प्रसारणाची तक्रार आल्यास संबंधित केबल चालकाकडून कार्यक्रमाची दृश्य मागविण्याचे अधिकार समितीला आहेत. ज्या नोंदणीकृत खासगी वाहिन्या, एफ.एम. रेडिओ केंद्र किंवा कम्युनिटी रेडिओ केंद्रावरुन आक्षेपार्ह प्रक्षेपण करत असतील, अशा वाहिन्यांची किंवा रेडिओची तक्रार प्राप्त झाल्यास या कायद्यानुसार संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर शाखेने स्थानिक वृत्त वाहिन्यांना केबल ऑपरेटर म्हणून नोंदणी देण्याऐवजी फक्त केबल ऑपरेटर किंवा केबल परिचालक म्हणूनच परवानगी द्यावी. टपाल विभागानेही याबाबतची नोंद घेणे आवश्यक आहे, असे सूर्यवंशी सांगितले. या बैठकीस समितीचे सदस्य प्र. भु. शेळके, प्राचार्या मंगला गायकवाड, उज्ज्वल पाईकराव, प्राचार्य सुरेश कोल्हे, अरुणा होकर्णे आदींची उपस्थिती होती.