रहिवासी प्रमाणपत्र देण्यास चालढकलपणा; महिलांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे
By विजय पाटील | Published: July 1, 2024 06:40 PM2024-07-01T18:40:42+5:302024-07-01T18:42:11+5:30
प्रमाणपत्रासाठी चालढकलपणा केला जावू लागल्याने महिला व ग्रामस्थ संतप्त
हिंगोली: राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी’ योजना सुरु केली असून, यासाठी प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. प्रमाणपत्र देणे सुरु असतानाच चालढकलपणा होऊ लागला आहे. हे पाहून सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील महिलांनी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.
‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी ’ योजना जाहीर होताच सर्वच ठिकाणी ग्रामपंचायतीने रहिवासी प्रमाणपत्र देणे सुरु केले. सदर योजनेत रहिवासी प्रमाणपत्र लागत आहे, हे समजल्यापासून १ जुलै रोजी सकाळपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर गर्दी झाली. परंतु प्रमाणपत्रासाठी चालढकलपणा केला जावू लागला. त्यामुळे महिला व ग्रामस्थ संतप्त झाले. यानंतर सकाळी अकरा वाजता महिलांनी कडोळी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.
रहिवासी प्रमाणपत्र मोफत द्यावे...
रहिवासी प्रमाणपत्रासाठी जी काही शासनाची शुल्क आहे ती घेतली तर आमचे काही म्हणणे नाही. परंतु अव्वाच्या सव्वा पैसे घेतले जात असल्यामुळे संतोष माहोरकर, विगेश देवकर यांच्यासह चार ते पाच महिलांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. याबाबत ग्रामसेवकाला फोन केला असता त्यांचा फोन ‘नॉटरिचेबल’ येऊ लागला होता.