२० गुंठ्याच्या शेडनेट शेतीतून मिळतेय दररोज २ क्विंटल शिमला मिरचीचे उत्पादन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 11:53 AM2018-12-19T11:53:31+5:302018-12-19T11:55:00+5:30

यशकथा : ढोबळी मिरचीनंतर या ठिकाणी गुलाबाची  शेती ते करणार आहेत.

Production of 2 quintals of Simla chilli every day from the 20 knit shadenet farming | २० गुंठ्याच्या शेडनेट शेतीतून मिळतेय दररोज २ क्विंटल शिमला मिरचीचे उत्पादन 

२० गुंठ्याच्या शेडनेट शेतीतून मिळतेय दररोज २ क्विंटल शिमला मिरचीचे उत्पादन 

googlenewsNext

- अरुण चव्हाण  (हिंगोली) 

पारंपरिक शेतीला कंटाळून वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथील एका तरुण शेतकऱ्याने कृषी विभागाकडून ग्रीन शेड नेट हाऊस घेऊन २० गुंठे जमिनीमध्ये शिमला मिरचीची लागवड केली आहे. या माध्यमातून दररोज दोन क्विंटल शिमला मिरचीचे उत्पादन होत आहे.

वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथील तरुण शेतकरी सुरेश सुदामराव चव्हाण यांना चार एकर शेती आहे. शिक्षण जेमतेम बारावीपर्यंत असल्याने नोकरी लागत नव्हती. त्यामुळे ते शेतीकडे वळले. बोअरला पाणी अल्प प्रमाणात होते. त्यांना या शेतीत पाण्याअभावी उत्पन्न खूपच कमी होत होते. गत दोन-तीन वर्षांपासून पावसाचे पाणी कमी व अनियमितता त्यामुळे खर्च जास्त उत्पन्न कमी होत होते. निसर्गाच्या लहरीपणाच्या शेतीवर काही तरी नवीन प्रयोग करून शेती करावी, असा विचार केला. अल्प प्रमाणात बोअरला पाणी असल्यामुळे ऊस, हळद, यासारखी नगदी पिके घेता येत नव्हती. त्यांनी कृषी विभाग वसमत यांच्याशी संपर्क साधून २० गुंठे जमिनीवर ग्रीन शेडनेट हाऊस उभे केले.

हा खर्च स्वत: केला. त्यानंतर ५० टक्के सबसिडी कृषी विभागाकडून मिळाली. या शेड हाऊसमध्ये ५ आॅगस्ट २०१८ रोजी रोपे आणून लावली गत महिन्यापासून दररोज २ क्विंटल म्हणजे अंदाजे तीन टन माल निघाला असून बाजारपेठेत १८०० ते २ हजार रुपये टन दराने विक्री होत आहे. त्यामुळे त्यांना महिन्याकाठी एक लाख रुपये मिळाले आहेत. हा माल परभणी, नांदेड, हिंगोलीच्या बाजारपेठेत विक्री करीत असून, आगामी काळात ३० ते ३५ टन शिमला मिरचीचे उत्पादन होईल. त्यामुळे या शेतकऱ्याला २० गुंठे जमिनीमध्ये ६ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. या मिरचीला त्यांनी जैविक खते दिली आहेत. या ठिकाणी ग्रीन शेड हाऊससाठी वसमतचे कृषी अधिकारी गजानन पवार, कृषी पर्यवेक्षक माने, कृषी सहायक योगिता अंभोरे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. 

या बरोबरच जैविक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ढोबळी मिरचीसह झेंडूचे फुले, मेथी याचे उत्पादन घेतले असून, यासाठी गोमूत्र, शेणखत, लिंबोळी अर्क यांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे कमी जमिनीत अधिक उत्पन्न मिळत आहे.  मिरची संगोपनासाठी स्वत: सुरेश चव्हाण यांनी पत्नी आणि एका मजुराच्या साहाय्याने शेतीचे नियोजन केले.

ढोबळी मिरचीनंतर या ठिकाणी गुलाबाची  शेती ते करणार आहेत. बाजारपेठेत गुलाबाला चांगली मागणी असून, ‘व्हॅलेंटाईन डे’ला सर्वाधिक गुलाब फुलांची विक्री होते. याअनुषंगाने सुरेश चव्हाण यांनी आतापासूनच गुलाब शेतीचे नियोजन सुरू केले आहे. या तरुण शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती करणे सुरू केले आहे. दुष्काळाची तमा न बाळगता, उपलब्ध असलेल्या कमी पाण्याचे त्यांनी व्यवस्थित नियोजन करून हे सर्व यश मिळविले आहे. त्यांची शेतीमधील ही भरारी पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी या ठिकाणी शेती पाहण्यासाठी भेटी देत आहेत. अनेक शेतकरी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असल्याचे सुरेश चव्हाण यांनी सांगितले. 

Web Title: Production of 2 quintals of Simla chilli every day from the 20 knit shadenet farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.