आंदोलनाची दखल घेत वीज समस्या सोडविण्याचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:32 AM2021-09-18T04:32:30+5:302021-09-18T04:32:30+5:30
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव परिसरातील गावांमधील वीज समस्यांसंदर्भात जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य संजय देशमुख यांनी ...
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव परिसरातील गावांमधील वीज समस्यांसंदर्भात जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य संजय देशमुख यांनी शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरूवात केली होती. या उपोषणाची दखल घेत महावितरणने मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे पानकनेरगाव परिसरातील वीज समस्या मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
सेनगाव तालुक्यातील खैरखेडा, शेगाव खोडके तसेच म्हाळशी ही गावे आजेगाव व पानकनेरगाव ३३ केव्हीला जोडण्यात आली आहेत. मात्र, या गावांचे अंतर दूर असल्याने नेहमी कमी दाबाचा व अनियमित वीज पुरवठा होत आहे. या गावांना पानकनेरगाव ३३ केव्हीला जोडावे किंवा स्वतंत्र फिडर देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय देशमुख यांनी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे १७ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी सभापती संजय देशमुख, सेनगाव पंचायत समितीचे सभापती संतोष खोडके पाटील यांच्यासह खैरखेडा, शेगाव खोडके, म्हाळशी येथील ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेत मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिले. हे सर्व प्रस्ताव सुधारणा योजनेंतर्गत वरिष्ठ कार्यालयाला सादर केले जातील तसेच बुधवारी कार्यकारी अभियंता प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करतील, असे आश्वासन दिले. या उपोषणामुळे वीज पुरवठ्यासंदर्भातील प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
बेरूळा ग्रामस्थांचे आंदोलन
हिंगोली : औंढा तालुक्यातील बेरूळा येथे ग्रामस्थांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. बेरूळा येथील मातंग समाजाच्या जागेवर दरवर्षी धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. मात्र, या जागेवर काहींनी अतिक्रमण केले असून, ही जागा समाजाला देण्यात यावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये माणिक ढोकणे, राधाबाई ढोकणे, सुबाबाई कसाब, कठाळू ढोकणे, सुरेश कसाब, शिवाजी ढोकणे आदी सहभागी झाले होते.