बाजार समितीचा प्रचार जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:49 AM2019-01-12T00:49:15+5:302019-01-12T00:49:32+5:30
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असल्याने पुढारी मंडळी पायाला भिंगरी बांधून फिरताना दिसत आहेत. आ.संतोष टारफे, माजी खा.शिवाजी माने यांनी यासाठी जोर लावल्याचे चित्र दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असल्याने पुढारी मंडळी पायाला भिंगरी बांधून फिरताना दिसत आहेत. आ.संतोष टारफे, माजी खा.शिवाजी माने यांनी यासाठी जोर लावल्याचे चित्र दिसून येत आहे.
कायम काँग्रेसचे संजय बोंढारे यांच्या वर्चस्वाखाली राहिलेली ही बाजार समिती त्यांच्या ताब्यातून हिसकावण्यासाठी शिवसेना व भाजपने ऐनवेळी युती केली. काँग्रेसने मात्र त्यापूर्वीच साधव भूमिका घेत राष्ट्रवादीशी आघाडी केली होती. सात जागा तर दिल्याच शिवाय ज्या जागी उमेदवार कमी पडला ते उमेदवारही काँग्रेसकडूनच दिले. त्यामुळे आघाडीत विघ्न न येण्यासाठी पूर्ण तजविज आधीच करून ठेवली होती. विशेष म्हणजे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत शिवसेना व भाजप युतीच्या काही उमेदवारांनी मैदानातून पळ काढला. त्यामुळे अशा तीन जागा अधिकृतपणे काँग्रेसला मिळाल्या. मात्र एकजण काँग्रेस, भाजप व सेनेचाही सत्कार स्वीकारत असल्याने संदिग्ध भूमिका दिसत आहे.
या निवडणुकीला आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महत्त्व आले आहे. त्या निवडणुकीवर सकारात्मक परिणाम होण्याच्या आशेने सगळेच जण कामाला लागले आहेत. शिवसेना व भाजपची युतीही याच पार्श्वभूमिवर झाली. माजी खा. शिवाजी माने व राजेंद्र शिखरे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. विशेष म्हणजे भाजपचे माजी आ.गजाननराव घुगे व सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यातून विस्तवही आडवा जात नसताना युती जुळवून घेण्यात आली होती. त्यामुळे युतीच्या नेत्यांनाही या निवडणुकीत पदरी यश येण्याची अपेक्षा आहे. तर निवडणुकीआधीच तीन जागा पदरात पडलेली काँग्रेस उर्वरित जागांमधून बहुमताच्या पुढचाच आकडा गाठू असा विश्वास दाखवत आहे. १३ रोजी मतदान होणार आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत यापूर्वी केवळ ठरावीक मतदारांना भेट दिली की, मार्ग मोकळा व्हायचा. आता पदयात्रा काढण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे पुढाऱ्यांपासून जि.प.सदस्यांपर्यंत सगळेच प्रचारात दंग झाल्याचे दिसत आहे. शेवाळा व बाळापूरच्या जागांकडे विशेष लक्ष आहे. दत्ता माने व दत्ता बोंढारे या दोघांना सभापतीपदाचे दावेदार मानले जात असल्याने येथे प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहेत. तसेही बाळापुरात व्यापारी,हमाल, मापारी मतदानामुळे निवडणुकीचे वारे जोरात आहे.
१८ पैकी ४ जागा बिनविरोध निघाल्या. त्यात दांडेगावचे साहेबराव जाधव, सिंदगीतील अनिल रणखांब, जवळा पांचाळचे मारोती पवार, लाखच्या कावेरीबाई सावळे यांचा समावेश आहे.