बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी योग्य नियोजन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:21 AM2021-07-10T04:21:36+5:302021-07-10T04:21:36+5:30

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाचे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, आदी ...

Proper planning should be done for availability of seeds and fertilizers | बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी योग्य नियोजन करावे

बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी योग्य नियोजन करावे

Next

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाचे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, आदी कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कृषी विभागाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री गायकवाड बोलत होत्या. यावेळी आमदार तान्हाजी मुळकुळे, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या बियाण्यांची उगवणक्षमता तपासून पेरणीबाबत तांत्रिक तपशील समजेल अशा भाषेत त्यांच्यापर्यंत पोहोचवावा. तसेच शासनाने तयार केलेल्या सोयाबीन लागवडीच्या चतु:सूत्री कार्यक्रमाची माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. खते व बियाणे शेतकऱ्यांना योग्य दरात व योग्य वेळी उपलब्ध होतील यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे. तसेच बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करावी. खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण व पीक विम्याचा लवकरात लवकर लाभ उपलब्ध करून द्यावा. शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा जमा झाला नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यात लक्ष घालण्याचे आदेशही त्यांनी दिले.

यावेळी बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी जिल्ह्यातील खरीप हंगामातील पीक परिस्थितीचा सविस्तर अहवाल सादर केला.

Web Title: Proper planning should be done for availability of seeds and fertilizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.