लिगो’ला विशेष प्रकल्पाचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 04:34 PM2017-07-22T16:34:08+5:302017-07-22T16:35:34+5:30
या प्रकल्पास विशेष प्रकल्पाचा दर्जा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रयत्न केले जात असून तसे पत्र महाराष्ट्र शासनाला पाठविले आहे.
ऑनलाईन लोकमत
हिंगोली : लिगो इंडिया हा गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या प्रयोगशाळेचा प्रकल्प भारतातील पहिलाच प्रकल्प आहे. अमेरिकेसमवेत जागतिक स्तरावर अभ्यासासाठी पुणे आयुकासह तीन अणुऊर्जा संस्था, दोन युजीसीच्या संस्था, तीन आयएसईआर संस्था व दोन आयआयटी संस्था अशा दहा संस्था काम करणार आहेत. या प्रकल्पास विशेष प्रकल्पाचा दर्जा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रयत्न केले जात असून तसे पत्र महाराष्ट्र शासनाला पाठविले आहे.
गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करण्यासाठी दक्षिण गोलार्धात हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. यामुळे भारतही भौतिकशास्त्र अभ्यासात महत्त्वाचे स्थान प्राप्त करणार आहे. भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र व विश्व उत्पत्तीशास्त्राच्या अभ्यासात याचे मोठे योगदान राहणार आहे. यामुळे भारतातून या प्रयोगासाठी उपयोगी प्रयोगशाळा, औद्योगिक अस्थापनांना क्षमतावाढीस फायदा होईल, अशीही धारणा आहे.
या प्रकल्पासाठी विशेष तांत्रिक मनुष्यबळ लागणार असल्याने त्याचा भारतीय तरुणांना होईल. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ही प्रयोगशाळा उपयुक्त ठरणार आहे. तसेच इतरही विविध प्रकारच्या रोजगार संधी उपलब्ध होतील. त्यामुळे हिंगोलीसह मराठवाड्याच्या विकासाला हातभार लावू शकणाºया या प्रकल्पाला विशेष प्रकल्पाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी पाठविला आहे.