पुन्हा ७३ शाळा सुरू करण्याचे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:30 AM2021-07-28T04:30:45+5:302021-07-28T04:30:45+5:30
हिंगोली जिल्ह्यात जवळपास ३७३ शाळांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग आहेत. या शाळा सुरू करण्यासाठी गावपातळीवर समिती आहे. या समितीने ...
हिंगोली जिल्ह्यात जवळपास ३७३ शाळांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग आहेत. या शाळा सुरू करण्यासाठी गावपातळीवर समिती आहे. या समितीने मागील महिनाभरात गावात रुग्ण आढळला की नाही, याची चाचपणी करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यायचा आहे. अनेक गावांत मागील दोन महिन्यांपासून एकही रुग्ण नाही. मात्र तरीही शाळा सुरू करण्यासाठी नेमकी काय अडचण आहे? हे कळायला मार्ग नाही. ग्रामपातळीवर दैनंदिन सर्व व्यवहार सुरू आहेत. मुले एकत्रित खेळण्यासह गावात विविध धार्मिक कार्यक्रमांमध्येही सहभागी होताना दिसत आहेत. कोरोनाचा कहर कमी झाल्यापासून मास्कसह इतर सर्वच बाबींचा विसर पडल्याचे दिसत आहे. अशावेळी शाळा सुरू झाल्या तर या मुलांमध्ये जागृती करून त्यांच्यामार्फत पालकांनाही दक्षतेचे धडे देता येणार आहेत. मात्र समित्यांसह प्रशासकीय पातळीवरही शाळा सुरू करण्याबाबत उदासीनता दिसत आहे.
जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमलीची घटली आहे. शाळा सुरू करण्याबाबत शासनानेही स्पष्ट निकष ठरवून दिले आहेत. त्यानंतरही मुलाला शाळेत पाठवायचे की नाही, याची संमती पालकांनीच द्यायची आहे. मात्र शाळा सुरू करण्यासाठी एवढा विलंब होत असल्याने प्रशासकीय पातळीवरूनच शाळा सुरू न करण्याचा घाट घातला जात असल्याचे चित्र आहे.
माध्यमिक विभागाकडून आता ४० शाळा सुरू करण्याचे प्रस्ताव सज्ज आहेत. यापूर्वी ८ शाळा सुरू झाल्या आहेत. तर प्राथमिककडून ३३ शाळांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार असल्याचे सांगितले जात आहे.