रस्त्यावर दूध फेकून सरकारचा निषेध; हिंगोलीतील गोरेगावचे शेतकरी आक्रमक
By विजय पाटील | Published: December 8, 2023 04:07 PM2023-12-08T16:07:39+5:302023-12-08T16:09:13+5:30
शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून रस्त्यावर दूध फेकत, विविध घोषणा देत सरकारचा निषेध केला आहे.
हिंगोली: बँक कर्ज परतफेडीसाठी अवयव विक्रीस काढूनही शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे आता सेनगाव तालुक्यातील गोरेगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. ८ डिसेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून रस्त्यावर दूध फेकत, विविध घोषणा देत सरकारचा निषेध केला आहे.
दोन वर्षापासून सतत दुष्काळी परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. असे असताना सरकारच्या अस्मानी-सुलतानी धोरणांमुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आल्याचे चित्र खरीप हंगामापासून पहावयास मिळत आहे. यंदा खरीप हंगामात प्रचंड उत्पन्न घटीचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. त्यात पिकविमा परतावा किंवा कुठलीच शासकीय मदत अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही. विशेष म्हणजे शेतात रात्रंदिवस काबाडकष्ट करुन शेतीमालाला योग्य भावही मिळत नाही. त्यामुळे शेतीतून लावलागवडीचा खर्चही वसूल झाला नसताना डोक्यावर झालेल्या बँक कर्जाचा बोजा उतरवायचा कसा? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
अशा परिस्थितीत गोरेगावसह परिसरातील दहा शेतकऱ्यांकडून आमची किडनी, डोळे, लिव्हर आदी अवयव विकत घेऊन बँक कर्जाची परतफेड करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. मात्र शासनाकडून याबाबत दखल घेण्यात आली नाही. आता संबंधित शेतकऱ्यांनी परत मुख्यमंत्र्यांकडे सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यात आली असून गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर ८ डिसेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सदर आंदोलनाच्या पहिल्या दिवशी येथील मुख्य रस्त्यावर दूध सांडून देत सरकारच्या दुर्लक्षित धोरणाबाबत घोषणा दिल्या. यावेळी निषेध आंदोलनही करण्यात आले.