हिंगोलीत जिल्हा कचेरीचे प्रवेशद्वार बंद करून दिव्यांगांचे आंदोलन
By विजय पाटील | Published: August 29, 2022 04:44 PM2022-08-29T16:44:57+5:302022-08-29T16:45:27+5:30
सकाळपासून दिव्यांग धरणे देत बसले असताना कोणीही फिरकले नसल्याने संतप्त दिव्यांगांनी प्रवेशद्वारच बंद केल्याने अनेकांना बाहेर पडणे मुश्किल झाले
हिंगोली : मागील अनेक दिवसांपासून निवेदने देऊनही कोणी दखल घेत नसल्याने अपंग जनता दलाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाकडून या मंडळीची दखल घेण्यात आली. तसेच त्यांच्या मागण्यांसाठी जि.प.स्तरावर प्रयत्न सुरू झाल्याचे दिसत होते.
दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी या संघटनेने यापूर्वीही निवेदने दिली. मात्र कोणीच दखल घेत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. आज सकाळपासून दिव्यांग धरणे देत बसले असताना कोणीही फिरकले नसल्याने संतप्त दिव्यांगांनी प्रवेशद्वारच बंद केल्याने अनेकांना बाहेर पडणे मुश्किल झाले. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करून द्वार उघडले.
या आंदोलनकर्त्यांनी घरकुल योजनेत प्रपत्र ड मध्ये दिव्यांगांना प्राधान्याने लाभ द्यावा, शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग करावा, ग्रा.पं.मधील ५ टक्के निधीचे वेळेत वाटप करावे, ते न केल्यास ग्रामसेवकावर कारवाई करावी, पं.स.मध्ये अपंग तक्रार निवारण कक्ष सुरू करावा, तेथे अधिकारी नियुक्त करावा, रोहयोत जॉबकार्ड व रोजगार द्यावा, बीज भांडवल कर्ज प्रकरण मंजूर होवूनही कर्ज देणाऱ्या बँकांवर कारवाई करावी, दिव्यांगांना ३० दिवसांत राशनकार्ड देवून अंत्योदयचा लाभ द्यावा, निराधारांचे पगार दरमहा १ तारखेला करावे, अपंगांना व्यवसायासाठी स्टॉल द्यावे आदी मागण्या केल्या आहेत.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष रंगनाथ मुटकुळे, सवित्रा काळे, उमेश इंगोले, संदीप खंदारे, मारोती वाघमारे, नामदेव गरूड, सुभाष डाढाळे, नामदेव इंगोले, किरण आकलवाडे, प्रवेश धाबे, राजू धाबे, स. वहीद, गजानन पवार, केशव तायडे, गणेश गरड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या आंदोलनाला प्रहार अपंग क्रांती आंदोलन या संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी व्हडगीर यांनीही पाठिंबा दर्शविला.