कांदे, टोमॅटोसह भाजीपाला रस्त्यावर फेकत निषेध; अतिवृष्टीच्या अनुदानासाठी शेतकरी आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 11:34 AM2022-09-23T11:34:14+5:302022-09-23T11:35:08+5:30
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव सह बाभुळगाव आजेगाव व पुसेगाव या चार मंडळाला अतिवृष्टी अनुदान लाभातुन डावण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे
- दिलीप कावरखे
गोरेगाव ( जि.हिंगोली) : येथे अतिवृष्टी अनुदानासह विविध मागण्यासाठी गत आठवडा भरापासून शेतकऱ्यांनी बेमुदत संप पुकारला असताना तालुका भरात आंदोलनाचे सत्र सुरू आहे. २३ सप्टेंबर रोजी संतप्त शेतकऱ्यांकडून कांदे, बटाटे, टमाटे आदी भाजीपाला रस्त्यावर फेकून देत सरकारविरुध्द निषेध नोंदवण्यात आला.
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव सह बाभुळगाव आजेगाव व पुसेगाव या चार मंडळाला अतिवृष्टी अनुदान लाभातुन डावण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे . अतिवृष्टी अनुदानासह विविध मागण्यासाठी १६ सप्टेंबर पासून शेतकऱ्यांकडून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. मागण्यावर ठाम राहत तालुक्याभरात आंदोलनाचे सत्र सुरू आहे . शेतकरी आक्रमक होत आंदोलन काला तीव्र वळण लागत असल्याचे चित्र आहे. संतप्त आंदोलक शेतकऱ्यांकडूण संपाच्या आठव्या दिवशी गोरेगाव येथील मा जिजाऊ चौफुली रस्त्यावर कांदे , टमाटे ,बटाटे , कोबी , वांगे आदी भाजीपाला रस्यावर फेकत मुख्यमंत्री , कृषिमंत्री व राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध नोंदविण्यात आला .
आंदोलक शेतकऱ्यांना घेतले ताब्यात....
संपकरी शेतकऱ्यांकडून पोलीस ठाण्यात निवेदन देत २३ सप्टेबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय राज्य मंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देण्यात आला असताना हिंगोलीकडे रवाना होण्याच्या तय्यारीत असलेल्या नामदेव पतंगे , गजानन कावरखे , गजानन सावके या शेतकरी आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील , पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव , सपोनी सुनील गोपींवार आदींसह चौफुली मुख्य रस्त्यावर पोलिसांचा फोजफाटा तैनात करण्यात आला होता.