कुरुंदा येथील नदीच्या खोलीकरणाचा प्रश्न पडला अडगळीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:38 AM2021-01-08T05:38:59+5:302021-01-08T05:38:59+5:30
कुरुंदा येथील नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणे झाडे-झुडुपे व गाळ मोठ्या प्रमाणावर साचला आहे. त्यामुळे नदीचे खोलीकरण व रुंदीकरण ...
कुरुंदा येथील नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणे झाडे-झुडुपे व गाळ मोठ्या प्रमाणावर साचला आहे. त्यामुळे नदीचे खोलीकरण व रुंदीकरण कमी झाल्यामुळे पावसाळ्यात थेट पाणी शेतात व गावात शिरते. परिणामी, पावसाळ्यात पुराचा फटका ग्रामस्थांना तसेच शेतकऱ्यांना सोसावा लागतो. ५ ते ६ गावांचे पाणी नदीच्या पात्रात येते. जास्त पाऊस झाल्यास हे पाणी गावात येते. त्यामुळे नदी खोलीकरण व रुंदीकरण करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा नागरिकांनी व ग्रामपंचायत स्तरावरून करण्यात आलेला आहे; परंतु त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले दिसते.
कुरुंदा येथून नदीचे पाणी किन्होळा गावामार्गे आसना नदीत जाते. हेही पात्र अत्यंत छोटे असल्याने पाणी वाहण्यासाठी अडथळा निर्माण होतो. परिणामी, शेतात पाणी शिरते. त्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान होते. दरवर्षी पावसाळ्यात पुराचा फटका ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना सोसावा लागतो. नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणाकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. कुरुंदा गावाचे नदीकाठी वास्तव्य असल्याने पावसाळ्यात पूर धोका संभवतो. नदीकाठ भोवताल मातीने उभारलेले कठडे कुचकामी ठरले, तर काही कठडे वाहून गेले. खोलीकरणाबरोबर नदीकाठी मजबूत कठडे उभारण्याची आवश्यकता आहे.