शिंदे गटातील बेबनाव उघड; खासदार हेमंत पाटील यांची मंत्री सत्तारांना थेट शिवीगाळ

By विजय पाटील | Published: January 6, 2024 03:44 PM2024-01-06T15:44:17+5:302024-01-06T15:45:52+5:30

हिंगोली जिल्हा नियोजनच्या निधीतील टक्केवारीवरून खासदारांची पालकमंत्र्यांना शिवीगाळ

Rada in Hingoli district planning meeting; MP Hemant Patil directly abused Minister Abdul Sattar | शिंदे गटातील बेबनाव उघड; खासदार हेमंत पाटील यांची मंत्री सत्तारांना थेट शिवीगाळ

शिंदे गटातील बेबनाव उघड; खासदार हेमंत पाटील यांची मंत्री सत्तारांना थेट शिवीगाळ

हिंगोली : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज सुरुवातीलाच खासदार हेमंत पाटील यांनी निधी वाटप करताना टक्केवारीचे शेण खाल्ले जात असल्याचा आरोप करीत पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना थेट शिवीगाळ केली. त्यामुळे ऑनलाईन बैठकीत पाटील यांचा माईक म्युट करून पुढील बैठक घेण्याची वेळ आली.

६ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यासाठी खा. हेमंत पाटील, आ.तान्हाजी मुटकुळे, आ.संतोष बांगर, आ.राजू नवघरे यांचीही उपस्थिती होती. तर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव आदीही उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीलाच पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत निधी वाटपातील भेदभावावरून संताप व्यक्त केला. तर राज्यात एवढे जिल्हे असताना हिंगोलीसारख्या मागास जिल्ह्यात येवून अशा पद्धतीने शेण खाणे योग्य नसल्याचे म्हटले. यावरून पालकमंत्री सत्तारही संतापले. त्यानंतर या दोघांत चांगलीच खडाजंगी झाली. पाटील यांनीही अशीच पद्धत चालू राहणार असेल तर तुम्ही किंवा तुमची माणसे जिल्ह्यात आले तर त्यांना शिवसैनिक पायाखाली तुडवतील, असा गंभीर इशारा सर्वांच्या साक्षीनेच दिला.

यामुळे वातावरण पेटल्याने अधिकाऱ्यांसह सर्वांचीच भंबेरी उडाली. या भानगडीत कोणी मध्यस्थी करण्याचा मात्र प्रयत्न केला नाही. एकाही आमदाराने यावर चकार शब्द काढला नाही. मागील काही दिवसांपासून निधीच्या नियोजनावरून जोरदार रस्सीखेच पहायला मिळत आहे. कधी आमदारांची नाराजी तर कधी खासदारांची नाराजी होत असल्याचे चित्र आहे.

पालकमंत्री व खासदारांचे जमेना
पालकमंत्री सत्तार हे अतिवृष्टीच्या पाहणी दौऱ्यावर आले असतानाही त्यांनी खासदारांचे आरक्षणाच्या प्रश्नावरून उल्लू बनाविंग असल्याचे म्हटले होते. त्यानंतर विभागीय नेते आनंद जाधव यांनी सत्तार यांना समज दिली जाईल, असे म्हटले होते. तर निधीवरून यापूर्वीही सत्तार व पाटील यांच्यात वाद उद्भवला होता. आ.बांगर यांचेही मध्यंतरी बिनसले होते. मागच्या वर्षी आ.तान्हाजी मुटकुळे यांचाही सत्तार यांच्यावर रोष असल्याचे दिसत होते.

शिंदे गटातील बेबनाव उघड
हिंगोली जिल्ह्यात शिंदे गटात बेबनाव असल्याचे समोर येत आहे. यापूर्वीपासूनच सुरू असलेल्या वादाला आता पुन्हा फोडणी बसली आहे. आधी आ.बांगर यांची नाराजी, आता खा. पाटील यांची नाराजी होत असल्याचे दिसत आहे. १० जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे सभा घेण्यासाठी येणार असल्याचे सांगितले जाते.

Web Title: Rada in Hingoli district planning meeting; MP Hemant Patil directly abused Minister Abdul Sattar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.