हिंगोलीत दोन गट भिडले, तुंबळ हाणामारीत चार जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 07:33 PM2024-11-23T19:33:04+5:302024-11-23T19:37:42+5:30
गोळीबार झाल्याची चर्चाही शहरात होत आहे. मात्र गोळीबाराच्या घटनेस पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
हिंगोली : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर २३ नोव्हेंबर रोजी शहरात दोन गटांत हाणामारी झाली. यात तीन ते चारजण जखमी झाले असून, गोळीबार झाल्याची चर्चाही शहरात होत आहे. मात्र गोळीबाराच्या घटनेस पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळाला नाही. शिंदे सेना व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाल्याची चर्चा असून, घटनेचे नेमके कारणही अद्याप पुढे आले नाही.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी- एकीकडे विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु होती. दुपारच्या सुमारास निकाल हाती येत होते. त्याच वेळी शहरात दोन गटात वाद झाला. या वादानंतर धारदार शस्त्राने हाणामारीही झाली. यात चार ते पाचजण जखमी झाले आहेत. हाणामारीनंतर शहरात गोळीबार झाल्याचीही चर्चा आहे. जखमींना उपचारासाठी हिंगोलीच्या लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पीटलमध्ये दाखल केले. येथे जखमींवर प्राथमिक उपचार करून नांदेडला हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस निरीक्षक विकास पाटील, नरेंद्र पाडळकर यांनी हॉस्पीटलमध्ये धाव घेतली. यावेळी हॉस्पीटलच्या बाहेर मोठी गर्दी झाली होती. शिंदे सेना व भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची शहरात चर्चा होती.
गोळीबार झाल्याचीही चर्चा
हाणामारीच्या घटनेनंतर गोळीबार झाल्याची शहरात चर्चा आहे. जखमी झालेले गोळीबारात जखमी झाले की, धारदार शस्त्राने याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. या संदर्भात पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले, घटनेतील जखमीला नांदेड येथे हलविले आहे. तेथील डॉक्टरांशी संपर्कात आहोत. दरम्यान, गोळीबाराच्या घटनेबाबत त्यांनी कोणतीही पुष्टी दिली नाही.