सरपंच निवडीवरून राडा; हिंगोलीतील वायचाळ पिंपरीत दोन गटांत तुंबळ हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 06:16 PM2021-02-09T18:16:53+5:302021-02-09T18:19:33+5:30
crime news मध्यस्ती करण्यास गेलेल्या पीएसआय मारुती नंदे यांनासुद्धा जमावाकडून धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती आहे.
गोरेगाव (जि. हिंगोली) : सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथे ८ फेब्रुवारी रोजी सरपंच निवडीप्रसंगी विरोधी गटाकडून ग्रामपंचायत सदस्य महिलेला मारहाण केल्याने मोठा गोंधळ उडाला. यात दोन गटांत हाणामारीही झाली. दरम्यान, चोख पोलीस बंदोबस्तात गुप्त मतदानाद्वारे सरपंच निवड पार पडली. गावाला छावणीचे स्वरूप आले होते.
सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथे एकूण नऊ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी परिवर्तन पॅनलचे तीन उमेदवार निवडणुकीत विजयी झाले, तर विकास आघाडी पॅनलचे चार उमेदवार विजयी झाले होते. दोन सदस्य बिनविरोध निवडून आले होते. या बिनविरोधपैकी एका महिला सदस्यावर दोन्ही गटांकडून दावा केला जात होता. मात्र, ही महिला एका गटासमवेत सहलीवर गेली होती. दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सरपंच निवड सताना दोन्ही पॅनलकडून सरपंच - उपसरपंच पदासाठीचे अर्ज दाखल करण्यात आले होते. दुपारी २ वाजता अर्ज मागे घेत सरपंच निवड प्रक्रिया सुरू होणार असताना पाच सदस्य संख्याबळ असलेल्या महाविकास आघाडी परिवर्तन पॅनलचे सदस्य ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित झाले. त्याचवेळी विरोधी गटातील काही महिलांनी ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश करीत तू या गटाकडून मतदान का करीत आहेस, असे म्हणत बिनविरोध निवडून आलेल्या सुमन दिलीप सातकर (वय ४५) यांना मारहाण केली.
याप्रसंगी दोन गटांत हाणामारीही झाली. मध्यस्ती करण्यास गेलेल्या पीएसआय मारुती नंदे यांनासुद्धा जमावाकडून धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती आहे. परिस्थिती आवाक्याबाहेर गेली असल्याने अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, ग्रामीणचे डीवायएसपी वाखोरे, पो. नि. सुरेश दळवे यांनी वायचाळ पिंपरी येथे भेट दिली. तसेच अतिरिक्त पोलीस बंदोबस्त बोलावून जमावाला पांगवण्यात आले. नंतर एसआरपी प्लाटून तुकडीसह तगड्या पोलीस बंदोबस्तामध्ये सरपंच निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. मारहाणीमध्ये जखमी झालेल्या सदस्य महिलेला कनेरगाव नाका येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असताना उपचारानंतर सरपंच निवडीच्या मतदानासाठी परत ग्रामपंचायत कार्यालयात आणण्यात आले होते. दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाचशे मीटर आत प्रवेशबंदी करीत गुप्त पद्धतीच्या मतदानाद्वारे सरपंच निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली.
प्रियंका भगत यांची सरपंचपदी निवड
यावेळी परिवर्तन पॅनलच्या प्रियंका भगत यांची सरपंच म्हणून निवड झाली. मात्र, उपसरपंचाची मतदान प्रक्रिया झाल्यावर एक मतदान बाद झाल्याचे समोर आले. दोन्ही पॅनलच्या उमेदवारांना समान मते पडली. त्यानंतर ईश्वर चिठ्ठीवर निकाल लागला. यात विकास आघाडी पॅनलच्या प्रियंका विश्वास सोळंके यांची उपसरपंचपदी निवड झाली. त्यामुळे सरपंचपद एका गटाकडे, तर उपसरपंचपद दुसऱ्या गटाकडे गेले.