गोळेगाव, येळीत मटक्यावर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:42 AM2018-10-24T00:42:54+5:302018-10-24T00:43:11+5:30
तालुक्यातील गोळेगाव व येळी फाटा येथे चालू असलेल्या मटका व जुगार अड्ड्यावर हिंगोली स्थानिक गुन्हा शाखेने कार्यवाही करीत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : तालुक्यातील गोळेगाव व येळी फाटा येथे चालू असलेल्या मटका व जुगार अड्ड्यावर हिंगोली स्थानिक गुन्हा शाखेने कार्यवाही करीत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे दीड महिन्यापूर्वीच ३० आॅगस्ट रोजी हिंगोली ग्रामीण पोलीसांनी याच ठिकाणी धाड टाकून कारवाई करीत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला होता.
औंढा नागनाथ तालुक्यात सर्वत्र अवैध धंदे बंद असले तरी छुप्या पद्धत्तीने मटका व जुगार चालविल्या जात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पोलिस अधीक्षक योगेश कुमार याच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो उप नि विनायक लंबे व स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी यांनी २२ अक्टोबर रोजी चारच्या सुमारास गोळेगाव येथे धाड टाकली. पूर्णा मुख्य कालव्याच्या पश्चिमेस अशोक पोले, मारोती देशमुख, विवेक पंपटवार मिलन मटका चालवीत असल्याचे निदर्शनास आले, यावेळी त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपितांकडून मिलन मटक्याचे आकडे कार्बन टाकून लिहलेले बुक, मोबाईल, स्विफ्ट डिझायर कार व नगद १४ हजार २४० असा ६ लाख १६ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जमादार बालाजी बोके यांच्या फिर्यादीवरून औंढा पोलिसांत कलम २०६ व १०९ भादंविप्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. तपास जमादार अफसर शेख व पिंपरें हे करीत आहेत. येळी फाटा येथे सुभाष कुटे, भगवान नागरे, उत्तम आघाव, भिंगे मामा यांना मिलन मटका खेळविणे व मदत करणे या आरोपाखाली ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. आरोपींकडून २ हजार ६२० नगदी, दोन मोबाईल व मिलन मटक्याच्या आकडे टाकलेल्या चिठ्या आदी साहित्य जप्त केले. लंबे यांनी गुन्हा दाखल केला आहे.