६ ठिकाणावरील बोगस डॉक्टरांवर छापे, एका गावात आरोग्य पथकास ग्रामस्थांचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 12:35 PM2022-03-16T12:35:29+5:302022-03-16T12:36:22+5:30
वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसलेल्या डॉक्टरांचा अहवाल आरोग्य विभागाने कार्यवाहीसाठी जिल्हास्तरावर पाठविला आहे.
वसमत: ग्रामीण भागात बंगाली बोगस डॉक्टर नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळत आहेत, असे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच खळबळ उडाली आहे. आज सकाळी तालुका आरोग्य विभागाच्या ५ पथकाने बंगाली बोगस डॉक्टरांविरुध्द ६ ठिकाणी छापे टाकले. पथकाने तीन ठिकाणांवरुन वैद्यकीय साहित्य, औषध, गोळया ताब्यात घेतल्या आहेत. यादरम्यान, पार्डी खु येथे ग्रामस्थांनी आरोग्य विभागाच्या पथकास घेराव घालत छाप्यास विरोध केला.
वसमत तालुक्यातील हाट्टा,पार्डी खु,आरळ,मरसुळ,सुनेगाव,पांगरा शिंदे या ठिकाणावर बंगाली बोगस डॉक्टर अनेक दिवसापासून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळत होते. कोरोना काळातही या बोगस डॉक्टरांनी उपचार केला. याबाबत लोकमतमध्ये वृत प्रकाशित होताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप काळे यांनी बोगस डॉक्टरांची माहीती घेतली. मंगळवारी आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य आधिकारी डॉ संदीप काळे, डॉ पन्मवार, डॉ सिद्दीकी, डॉ कोठुळे, डॉ जिंतुरकर, डॉ महाजन, डॉ चिटमोगरे यांच्यासह आरोग्य कर्मचारी यांचे ५ पथके तयार केले. या पथकाने हाटा, पार्डी खु, आरळ या ठिकाणी छापे टाकले असता येथे बोगस बंगाली डॉक्टर रुग्णांवर उपचार करताना आढळून आले. पथकाने त्यांच्याकडील वैद्यकीय साहित्य, औषध, गोळ्या आदी साहित्य जप्त केले. पार्डी खु येथील डॉक्टरकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नाही, हाटा येथील बोगस डॉक्टरकडे बोगस प्रमाणपत्र मिळून आले. तर पांग्रा शिंदे, मरसुळ, सुनेगाव या ठिकाणी आरोग्य पथक जाण्याआधिच बोगस डॉक्टरांनी पळ काढला.
दरम्यान, पार्डी खु येथे बोगस बंगाली डॉक्टरच्या ठिकाणावर छापा मारताच येथील ग्रामस्थांनी आरोग्य विभागाच्या पथकास घेराव घातला. जप्त केलेले वैद्यकीय साहित्य पथकाकडून जमावाने हिसकावून घेतले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदिप काळे यांनी जमावास समजावून सांगत शांत केले. वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसलेल्या डॉक्टरांचा अहवाल आरोग्य विभागाने कार्यवाहीसाठी जिल्हास्तरावर पाठविला आहे. आरोग्य विभागाच्या छापा सत्राने बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे.
अहवाल वरिष्ठांकडे पाठविला
३ ठिकाणी छाप्यात सापडलेल्या साहित्य कागद पत्रांची पडताळणी करण्यात आली सर्व प्रकार बोगस आहे. नागरिकांनी डॉक्टरांची पदवी तपासून आरोग्य सेवा घेतली पाहीजे. बोगस डॉक्टरांकडून उपचार घेतल्याने जीवितास धोका होऊ शकतो. नागरिकांनी प्रशासनास मदत करावी. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे.
- डॉ संदिप काळे, तालुका आरोग्य आधिकारी,वसमत.