टीसी असल्याचे भासवत प्रवाशांना लुटणारा भामटा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात
By रमेश वाबळे | Updated: February 5, 2025 19:32 IST2025-02-05T19:31:26+5:302025-02-05T19:32:33+5:30
एकजण टीसी असल्याचे भासवत हिंगोली रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे तिकीट तपासणी करीत होता.

टीसी असल्याचे भासवत प्रवाशांना लुटणारा भामटा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात
हिंगोली : टीसी असल्याचे भासवत प्रवाशांचे तिकीट तपासणीसह पैसे उकळणाऱ्या एका भामट्यास प्रवाशांनी पकडून रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. हा प्रकार ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास हिंगोली येथील रेल्वे स्थानकावर घडला. दिनेश गोविंद महाडिक (रा.क्यू.नो.४०२ के. टाईप, अगवालीचाल भुसावळ, जळगाव) असे भामट्याचे नाव आहे.
अलीकडच्या काळात रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. या प्रकारास आळा घालण्यासाठी रेल्वे विभागाच्या वतीने उपाययोजना आखण्यात येत असून, त्यांतर्गत रेल्वेगाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तिकीट तपासणी, तसेच रेल्वेतून उतरलेल्या काही प्रवाशांची स्थानकावरही तिकीट तपासणी करण्यात येते. ५ फेब्रुवारी रोजी एकजण टीसी असल्याचे भासवत हिंगोली रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे तिकीट तपासणी करीत होता.
यादरम्यान, काही जणांकडून तो पैसेही उकळत असल्याचा प्रकार काही प्रवाशांच्या लक्षात आला. शिवाय भामट्याच्या गळ्यातील ओळखपत्रही बनावट असल्याचा संशय बळावल्याने प्रवाशांनी त्यास रेल्वे पोलिसांच्या हवाली केली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करीत ओळखपत्र तपासले असता ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले. भामटा दिनेश गोविंद महाडिक यास ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. याप्रकरणी गुन्हा नोंदविणार असल्याचेही रेल्वेसुत्रांनी सांगितले.