रेल्वे पोलीसच करायचा गांजा तस्करी; हिंगोलीत ३८ किलो गांजासह तिघे ताब्यात
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: March 3, 2023 01:13 PM2023-03-03T13:13:06+5:302023-03-03T13:13:48+5:30
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई: रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यासह तिघेजण ताब्यात
हिंगोली: एका कारमधून ९ लाख ६५ हजार रुपये किमतीचा गांजा घेऊन जाणाऱ्या एका रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यासह तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. ही कारवाई औंढा येथे २ मार्च रोजी सायंकाळी केली. या प्रकरणी रात्री ११.३० वाजता गुन्हा दाखल झाला.
औंढा ना ते परभणी रोडवरून एका कारमधून गांजाचा साठा नेला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील , पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने औंढा ना येथील शासकीय विश्रामगृहाजवळ सापळा लावला.
या वेळी कारची तपासणी केली. तेव्हा कारमध्ये १४ पाकिटात ३८ किलो ६०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी ९ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या गांजासह ५ लाखांची कार असा एकूण १४ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या फिर्यादीवरून रवींद्र अमरसिंह राठोड ( लोहमार्ग पोलीस चौकी पूर्णा, रा.कृष्णा ता. जिल्हा वाशिम), शेख गौस शेख पाशा ( कारचालक रा. पूर्णा),शेख मईनोद्दीन शेख अलीमोद्दीन (रा. पूर्णा) याच्या विरुद्ध औंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही कारवाई पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, सपोनी शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार संभाजी लकुळे,गजानन पोकळे, गणेश लेकूळे, ज्ञानेश्वर पायघन,तुषार ठाकरे, रविकांत हरकळ, गिरी यांच्या पथकाने केली.