रेल्वेस्थानक निर्मनुष्य; प्रवाशांची गर्दीही ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:37 AM2021-04-30T04:37:51+5:302021-04-30T04:37:51+5:30

हिंगोली: कोरोना महामारीचे रुग्ण जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये वाढत असल्याचे पाहून प्रवाशांनी प्रवास करणे टाळले आहे. परिणामी, रेल्वेस्थानक निर्मनुष्य ...

Railway station uninhabited; The crowd of passengers also subsided | रेल्वेस्थानक निर्मनुष्य; प्रवाशांची गर्दीही ओसरली

रेल्वेस्थानक निर्मनुष्य; प्रवाशांची गर्दीही ओसरली

Next

हिंगोली: कोरोना महामारीचे रुग्ण जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये वाढत असल्याचे पाहून प्रवाशांनी प्रवास करणे टाळले आहे. परिणामी, रेल्वेस्थानक निर्मनुष्य दिसत आहे. कोरोनामुळे पॅसेंजर रेल्वे तब्बल दीड वर्षांपासून बंदच आहे.

२३ मार्चपासून कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. कोरोनाआधी प्रत्येक रेल्वेगाडीतून जवळपास दोनशे ते तीनशे प्रवासी उतरायचे. परंतु, दीड वर्षांपासून प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने केवळ दहा ते पंधरा प्रवासी उतरत पहायला मिळत आहेत. जिल्ह्यात वसमत, चोंडी, सिरली, बोल्डा, नांदापूर, नवलगाव, माळसेलू आदी छोटे स्टेशन आहेत. आजमितीस इंटरसिटीसह रेल्वेगाडीबरोबर इतर साप्ताहिक रेल्वेगाड्या सुरू आहेत. या सर्व रेल्वे एक्स्प्रेस असल्यामुळे छोट्या स्टेशनवर थांबत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना हिंगोली येथे येऊनच पुढील प्रवास करावा लागत आहे.

कोरोना महामारीमुळे रुग्ण वाढत असल्याचे पाहून रेल्वे विभागाने कोल्हापूर ते नागपूर ही रेल्वेगाडी बंद केली आहे. सद्य:स्थितीत नरखेड ते काचीगुडा ही इंटरसिटी रेल्वे दररोज सुरू आहे. याचबरोबर जयपूर ते सिकंदराबाद, तिरुपती ते अमरावती, जयपूर ते हैदराबाद, नांदेड ते जम्मू या साप्ताहिक रेल्वेही नित्याने सुरू आहेत. परंतु, कोरोनामुळे कोणत्याच रेल्वेगाड्यांना प्रवासी नाहीत. हाऊसफुल्ल चालणाऱ्या सर्वच रेल्वे रिकाम्याच जात आहेत.

आजमितीस केवळ एक्सप्रेस रेल्वेच सुरू आहेत. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता रेल्वेतील प्रवाशांना मास्क बंधनकारक केले आहे. जे प्रवासी विनामास्क प्रवास करतील त्यांना दंड भरावा लागेल, असा इशाराही रेल्वे विभागाने दिला आहे.

पॅसेंजर रेल्वे तब्बल दीड वर्षांपासून बंदच

२३ मार्च २०२० पासून कोरोनाने सर्वत्र शिरकाव केला. त्यामुळे रेल्वे विभागाने एक्सप्रेस रेल्वे वगळता पॅसेंंजर रेल्वे पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. परजिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांची तपासणीही केली जात आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने रेल्वेस्थानक येथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांनी स्वत:बरोबरच इतर प्रवाशांचीही काळजी घ्यावी.

-रामसिंग मिना, रेल्वेस्टेशन मास्टर, हिंगोली

Web Title: Railway station uninhabited; The crowd of passengers also subsided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.