हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर; हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:20 PM2020-07-16T12:20:44+5:302020-07-16T12:36:55+5:30
कुरुंद्यात पुन्हा पाणी घुसले: येहळेगाव सर्कलमधील पिकांची दाणादाण
हिंगोली : जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे शेतकºयांना मोठा फटका बसला आहे. हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली असून जमिनी चिभडण्याची भीती निर्माण झाली आहे. कुरुंदा गावात पुन्हा पाणी शिरले तर हिंगोलीतही इंदिरानगरातील २0 ते २५ घरांत पाणी घुसले. कयाधूलाही चांगला पूर आल्याचे पहायला मिळाले. औंढा तालुक्यातील येहळेगाव सर्कलमध्ये तब्बल ९५ मिमी पाऊस झाला.
हिंगोली जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. आज पहाटे ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २५.२८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात हिंगोली-२५.२९, कळमनुरी १८.१७, वसमत २६.४३, सेनगाव ६.५0, औंढा नागनाथ ५0 मिमी असे पर्जन्य झाले आहे. सकाळपासून पावसाची संततधार सुरूच आहे. वसमत तालुक्यातील कुरुंदा ८५ मिमी, येहळेगाव ९४ मिमी, औंढा नागनाथ ६४ मिमी अशी जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने या मंडळांत हाहाकार उडाला आहे. येहळेगाव सर्कलमधील मेथा, जडगाव आदी भागात शेतशिवारात पाणीच पाणी झाले. हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. जडगावात शाळेत पाणी घुसले होते.
कुरुंद्यात पुन्हा गावात पाणी
कुरुंदा येथे २९ जुलै २0१६ नंतर पुन्हा एकदा गावात पाणी शिरले आहे. या गावात नदीवरील पुलाच्या व रस्त्याच्या कामामुळे पाण्याला जाण्याचा मार्ग नसल्याने पाणी घुसले आहे. त्यामुळे गणेशनगर, साठेनगर, साईबाबा गल्ली, श्रीवास्तीनगर या भागातील घरांता मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे गावकºयांत भीतीचे वातावरण होते.
हिंगोलीतील इंदिरानगरात पाणी घुसले
हिंगोली शहरातील इंदिरानगर भागातही पाणी घुसले असून २0 ते २५ घरांत पाणी घुसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
नर्सीनजीक पुलावरून पाणी
नर्जीनजीक नाल्याचे पाणी पुलावरून जात होते. जवळपास एक किमी परिसरात हे पाणी पसरल्याने रस्त्यासह शिवारातही पाणीच पाणी दिसत होते. या रस्त्याचा अंदाज येत नसल्याने सेनगाव व हिंगोलीचा संपर्क बंद झाला होता. मागील वीस ते पंचवीस वर्षांत पहिल्यांदाच असा पाऊस पडल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
नांदापूरला नदीच्या पाण्याचा वेढा
कळमनुरी तालुक्यातील नांदापूरला नदीच्या पाण्याचा वेढा पडल्याने गावातून बाहेर जाणे अवघड झाले होते. कालच्या पावसाने कयाधूला मोठा पूर आल्याने आज सकाळीच नदीचे पाणी पात्रातून ओसंडून वाहत होते. शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले.
औंढ्यातही ओढ्याला पूर
औंढ्यातही ओढ्याला पूर आल्याने दरेगावमार्गे जाणाºया रस्त्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे तासभर वाहतूक खोळंबली होती. सकाळचे दूधवाले, मॉर्निंग वॉक करणारे यामुळे अडकून पडले होते.
कुरुंदा येथे नदीला महापूर अनेक घरात पाणी शिरले
कुरुंदा येथे बुधवारी रात्री झालेल्या धो धो पाऊसमुळे नदीचे पाणी ओसंडून रस्त्याने वाहत होते.नदीवरील पुलाच्या व रस्त्याच्या कामामुळे पाणी जाण्यास मार्ग नसल्याने गावात पाणी येत होते त्यामुळे गणेश नगर ,साठे नगर,साईबाबा गल्ली ,श्रीवास्तीनगर या भागातील घरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले होते.त्यामुळे गावकऱ्यांत भीती पसरली होती.ग्रा प च्या पाठीमागील भागातील पाणी नळ्या जात नसल्याने ते पाणी गणेशनगर मध्य शिरत होते.अनेक शेतात देखील नदीचे पाणी शिरले तर नदी ओलांडून वाहत होती त्यामुळे कुरुंदा ते टोकाई रस्ता बंद पडला आहे.