आज मराठवाड्यात पाऊस; हवामान विभागाचा पुन्हा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 11:50 AM2023-06-24T11:50:08+5:302023-06-24T11:50:51+5:30
विजांचा कडकडाट होऊन वारेही सुटलेले असेल, असे हवामान विभागाने सांगितले.
हिंगोली : प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार, २४ जून रोजी मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडेल. दरम्यान, विजांचा कडकडाटही होईल, असा अंदाज परभणीच्या ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविला आहे.
२४ जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळीवारा, मेघगर्जना होईल. दरम्यान, विजांचा कडकडाट होऊन वारेही सुटलेले असेल, असे हवामान विभागाने सांगितले. मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवसांत कमाल तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात २४ जून रोजी काही जिल्ह्यांत तर २५, २६, २७ जून रोजी बहुतांश जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात २३ ते २९ जूनदरम्यान पाऊस सरासरीएवढा व ३० जून ते ६ जुलैदरम्यान औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांतही सरासरीएवढा तसेच इतर जिल्ह्यांत पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.