'पाऊस लांबला, उत्पादन कमी होणार'; आर्थिक विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्याने संपविल जीवन
By रमेश वाबळे | Published: July 18, 2023 04:29 PM2023-07-18T16:29:45+5:302023-07-18T16:30:10+5:30
हिंगोली तालुक्यातील इडोळी येथील घटना
हिंगोली : नापीकी आणि कर्जबाजारीपणास कंटाळून ३५ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना तालुक्यातील इडोळी येथे १८ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. माधव रामजी जाधव असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
इडोळी येथील शेतकरी माधव रामजी जाधव कर्जबाजारीपणामुळे मागील काही दिवसांपासून विवंचनेत होते. त्यातच यंदा पाऊस लांबल्याने सुमारे वीस दिवस उशिराने पेरण्या झाल्या. त्यामुळे यंदाही उत्पादनावर परिणाम झाल्यास डोईवरील कर्जाचा डोंगर कसा उतरवायचा? असा प्रश्न त्यांना सतावत होता. त्यातच शेतकरी माधव जाधव यांनी इडोळी येथील आपल्या राहत्या घरात ओढणीने गळफास घेतला. ही घटना १८ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली.
मयत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे इडोळी येथे शोककळा पसरली आहे. दरम्यान, याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात दुपारपर्यंत नोंद झाली नव्हती.