हिंगोली जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; पिके पाण्याखाली, शेकडो घरात घुसले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 03:04 PM2024-09-01T15:04:39+5:302024-09-01T15:11:35+5:30
जिल्ह्यात मागील पंधरा तासांपासून मुसळधार पावसाची संततधार रविवारीही सुरू आहे.
- रमेश वाबळे
हिंगोली : जिल्ह्यात आठवड्यानंतर शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाची संततधार सुरू असून, या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. बहुतांश भागात पिके पाण्याखाली गेली आहेत. शेकडो घरांसह दुकानांमध्ये पाणी घुसल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. तर हिंगोली शहरात जवळपास दोनशेंहून अधिक नागरिकांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलविले आहे.
जिल्ह्यात मागील पंधरा तासांपासून मुसळधार पावसाची संततधार रविवारीही सुरू आहे. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणीचपाणी झाले असून, हिंगोली शहरातील पेन्शनपुरा, तोफखाना, सिद्धार्थनगर, बांगरनगर, जिनमातानगर या भागातील घरांसह दुकानांत पाणी शिरले. यामध्ये संसारोपयोगी वस्तू भिजल्या तर दुकानात पाणी शिरल्यामुळे लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे.
नगर पालिका प्रशासनाने या भागातील दोनशेहुन अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. अजूनही पाऊस सुरूच असल्याने प्रशासन सतर्क झाले असून, नगर पालिकेच्या पथकाने पाणी साचलेल्या ठिकाणी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आल्याने पिके जमिनीसह खरडून गेली आहेत. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
दरम्यान, पूर परिस्थितीत लक्षात घेता जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, पोलिस अधीक्षक कृष्णकांत कोकाटे, मुख्याधिकारी अरविंद मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक नरेंद्र पडळकर, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, नगर अभियंता रत्नाकर अडशिरे यांच्यासह पथकाने शहरात पाहणी सुरू केली आहे. पाहणीदरम्यान आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; पिके पाण्याखाली, शेकडो घरात घुसले पाणीhttps://t.co/CbvSFUB0GJpic.twitter.com/eUC9ug8t9J
— Lokmat (@lokmat) September 1, 2024
कयाधू नदीला पूर...
हिंगोली शहराजवळून वाहणाऱ्या कयाधू नदीला पूर आला असून, या पुराचे पाणी परिसरातील शेतशिवारात घुसरल्याने पिकांसह जमीन खरडली आहे.