राज ठाकरे भाजपाला चॅलेंज करणार; विधानसभेसाठी चौथ्या उमेदवाराची घोषणा, पाहा कोण आहे हा 'मनसैनिक'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 18:59 IST2024-08-08T18:56:08+5:302024-08-08T18:59:04+5:30
राज ठाकरे यांनी आतापर्यंत मनसेचे चार उमेदवार जाहीर केले असून यातील दोन उमेदवार भाजपच्या विद्यमान आमदारांविरोधात आहेत.

राज ठाकरे भाजपाला चॅलेंज करणार; विधानसभेसाठी चौथ्या उमेदवाराची घोषणा, पाहा कोण आहे हा 'मनसैनिक'?
MNS Raj Thackeray ( Marathi News ) :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून मागील काही दिवसांपासून ते राज्यातील काही जिल्ह्यांचा आढावा घेत आहेत. सोलापूर, धाराशिव, लातूरनंतर आज त्यांनी हिंगोलीत दाखल होत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर राज यांनी अप्रत्यक्षरीत्या मनसेचा विधानसभेसाठी चौथा उमेदवार जाहीर करून टाकला आहे. हिंगोली विधानसभा मतदारसंघात तुम्ही आता बंडू कुटे यांच्याकडे लक्ष द्या, असं आवाहन राज ठाकरेंनी मनसे पदाधिकारी आणि मतदारांना केलं.
राज ठाकरे यांचं आज हिंगोलीत मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. जिल्ह्यात राज यांची एंट्री होताच त्यांच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यानंतर राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली. ही आढावा बैठक संपल्यानंतर राज यांनी बंडू कुटे यांच्या खांद्यावर हात ठेवत तुम्ही आता यांच्याकडे लक्ष द्या, असं म्हणत कार्यकर्त्यांना कुटे यांच्या पाठीशी बळ उभं करण्याचं आवाहन त्यांनी केलं. बंडू कुटे हे मनसेचे विद्यमान हिंगोली जिल्हाध्यक्ष आहेत.
भाजपला थेट आव्हान
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण महायुतीला पाठिंबा देत असल्याची भूमिका घेतली होती. लोकसभेनंतर महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतही राज ठाकरेंचा पक्ष महायुतीसोबतच राहील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र राज ठाकरे यांनी आता आक्रमक भूमिका घेत 'एकला चलो रे'चा नारा दिल्याचं दिसत आहे. कारण त्यांनी आतापर्यंत पक्षाचे चार उमेदवार जाहीर केले असून यातील दोन उमेदवार भाजपच्या विद्यमान आमदारांविरोधात आहेत.
हिंगोली विधानसभा मतदारसंघातून सध्या भाजपचे तानाजी मुटकुळे हे आमदार आहेत. बंडू कुटे यांच्या रुपाने राज ठाकरे यांनी आपला मनसैनिक विधानसभेच्या रिंगणात उतरवला आहे. तसंच महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीकडून या मतदारसंघात उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथं यंदा चौरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यापूर्वी राज ठाकरे यांनी शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर, पंढरपूर विधानसभा मतदारसंघात दिलीप धोत्रे आणि लातूर विधानसभा मतदारसंघात संतोष नागरगोजे यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत.