Rajeev Satav : संसदरत्न राजीव सातव अनंतात विलीन; हजारो चाहत्यांनी साश्रुनयनांनी दिला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 12:20 PM2021-05-17T12:20:27+5:302021-05-17T12:25:48+5:30
Rajeev Satav : खा. सातव यांच्या कुटुंबीयांचा व चाहत्यांचा आक्रोश मन गहिवरून येणारा होता.
हिंगोली : कॉंग्रेसचे सरचिटणीस व राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान कळमनुरी येथे अंत्यविधी करण्यात आले. मुलगा पुष्कराज याने त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. त्यांच्या कुटुंबीयांसह हजारो चाहत्यांनी अंत्यदर्शन घेऊन साश्रूनयनांनी त्यांना निरोप दिला. अत्यंत शोकाकुल वातावरणात अनेकांना भावना अनावर झाल्या होत्या. खा. सातव यांच्या कुटुंबीयांचा व चाहत्यांचा आक्रोश मन गहिवरून येणारा होता. शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडला. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली.
खा. राजीव सातव यांना २३ एप्रिल राेजी त्यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्रास वाढल्याने २६ एप्रिल रोजी त्यांना अतिदक्षता विभागात हलवून व्हेंटिलेटरवर ठेवले होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांना फुप्फुसात न्यूमाेनियाचा संसर्ग झाला. प्रकृती बिघडत गेली व रविवारी पहाटे खा. सातव यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर रविवारी रात्री त्यांचे पार्थिव कळमनुरी येथे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर देशभरातून चाहत्यांनी कळमनुरी येथे सोमवारी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. सकाळी ८ वाजेपासून निवास्थानासमोर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी कोरोना नियमांचे पालन, सामाजिक अंतर ठेवत त्यांचे हजारो चाहते, काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध पक्षातील नेते येथे अंत्यदर्शनासाठी आले होते. अंत्यदर्शन घेत असताना कुटुंबीयांसह त्यांच्या अनेक चाहत्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. अंत्यविधीसाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा मंत्री नितीन राऊत,पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, मंत्री असलम शेख, राज्यमंत्री विश्वजीत कदम, सतेज पाटील, आ.अमर राजूरकर, आ.बालाजी कल्याणकर, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार राजू नवघरे, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, रामराव वडकुते, गजानन घुगे, प्रकाश पाटील देवसरकर, माजी खासदार शिवाजी माने, तुकाराम रेंगे, माजी आ.संतोष टारफे, माजी आ.विजय खडसे तसेच गुजरात मधील विरोधी पक्षनेते धनानी, काँग्रेस नेते रेड्डी, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कुंदल, विश्वजीत तांबे, यांच्यासह देशभरातून आलेले अनेक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.
राजीव सातव यांनी स्वतःला जातीच्या, प्रदेशाच्या चौकटीत कधीच सीमित केले नाही. त्यांची वृत्ती निर्लेप आणि स्वप्ने मोठी होती... दुर्दैवाने हे सारे अकाली संपले!https://t.co/V324Am9092
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) May 17, 2021
पंचायत समिती सदस्य ते संसद थक्क करणारा प्रवास
कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील मूळ असलेले अॅड. सातव यांचा पंचायत समिती सदस्य ते खासदार असा प्रवास थक्क करणारा प्रवास अकाली थांबल्याने अनेकांना धक्का बसला आहे. आई रजनी सातव यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू घेतल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात त्यांनी चमक दाखवली. उत्तम संघटनकाैशल्य, संयमी व सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांनी राष्ट्रीय राजकारणात ओळख निर्माण केली. काँग्रेसच्या वरिष्ठांच्या बैठकीतील धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग असायचा. सन २००९ मध्ये ते कळमनुरी विधानसभेचे आमदार झाले. ते युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षही हाते. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून २०१४ मध्ये मोदी लाटेतही ते विजयी झाले. २०२० मध्ये त्यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली. संसदेतील त्यांच्या लक्षवेधी व अभ्यासपूर्ण कामगिरीच्या बळावर त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.