राखी विक्रीतून जिल्ह्यात अडीच लाखांची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:34 AM2021-08-25T04:34:52+5:302021-08-25T04:34:52+5:30
हिंगोली: राखी पौर्णिमेसाठी मागील पंधरा दिवसांपासून राखी खरेदीसाठी बहिणींची लगबग सुरू हाेती. यावेळेस योगायोगाने राखी पौर्णिमेला अनलॉक झाल्यामुळे ...
हिंगोली: राखी पौर्णिमेसाठी मागील पंधरा दिवसांपासून राखी खरेदीसाठी बहिणींची लगबग सुरू हाेती. यावेळेस योगायोगाने राखी पौर्णिमेला अनलॉक झाल्यामुळे खरेदीसाठी बाजारात गर्दी पाहायला मिळाली. यामुळे राखी विक्रीतून जिल्ह्यात दाेन ते तीन लाखांची उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
पौर्णिमेच्या दिवशी हिंगाेली शहरातील गांधी चौक, महावीर चौक, फूल मार्केट, कपडा गल्ली व इतर मोक्याच्या ठिकाणी छोट्या विक्रेत्यांनी विविध प्रकारच्या राख्यांचे स्टॉल टाकले होते. २०१९ पासून कोरोनाने सर्वत्र कहर केल्यामुळे त्यावेळेस बाहेर पडणे मुश्कील होऊन बसले होते. आजमितीस कोरोना महामारी कमी झाल्यामुळे शासनाने सर्वत्र अनलॉक केला आहे. त्यामुळे राखी विक्रेत्यांनी २२ ऑगस्ट रोजी सकाळपासूनच जागोजागी राख्यांचे स्टॉल टाकले होते. महागाईने कळस गाठला, तरी भावाच्या प्रेमापोटी बहिणींनी मागे न पाहता जशी ऐपत असेल, त्याप्रमाणे राख्यांची खरेदी करून भावाला औक्षण करत राखी बांधली. पौर्णिमेच्या दिवशी बाजारपेठेत ५ रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत राख्यांची विक्री झाली. पौर्णिमेच्या पंधरा दिवसांअगोदरपासून राख्यांची गावोगावी विक्री झाल्याचे ठोक विक्रेत्यांनी सांगितले. राखी विक्रीतून पंधरा दिवसांत शहरासह जिल्ह्यात दोन ते अडीच लाखांची उलाढाल झाली आहे.
- दिल्लीची राखी हिंगोलीत...
मराठवाड्यातील हिंगोली जिल्हा लहान असला, तरी व्यापाराच्या बाबतीत पुढेच आहे. २०१९ मध्ये कोरोना काळात बहिणीला बाजारात मनपसंद राखी खरेदी करता आली नाही. यावेळेस अनलॉक झाल्यामुळे मनपसंत राखी खरेदी केली. राखी पौर्णिमा सण लक्षात घेता, दिल्ली, अहमदाबाद, मुंबई आदी मोठ्या शहरात जाऊन तेथून विविध प्रकारच्या राख्यांची खरेदी करून, हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यांत विक्री करत जवळपास अडीच-तीन लाखांची उलाढाल झाली आहे.
- मुकुल नेणवाणी, व्यापारी.