भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी रामराव वडकुते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:35 AM2021-09-24T04:35:08+5:302021-09-24T04:35:08+5:30
शिवाजी जाधव यांनी टोकाई कारखान्याच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता. आता टोकाईचे अध्यक्षपद मिळताच त्यांनी पुन्हा भाजपच्या जिल्हाध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावण्यास ...
शिवाजी जाधव यांनी टोकाई कारखान्याच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता. आता टोकाईचे अध्यक्षपद मिळताच त्यांनी पुन्हा भाजपच्या जिल्हाध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावण्यास प्रारंभ केल्याने या पदाचा पोरखेळ कधी संपणार? असा प्रश्न निर्माण झाला होता.
आधीच सत्तेत नसल्याने भाजपची जिल्ह्यातील मंडळी हैराण आहे. त्यामुळेच संघटनेतील पदे असूनही काहींना त्यात काहीच रस नाही. तर काहींना मात्र आगामी निवडणुकांच्या तोंडावर नव्या पदाची आस लागली आहे. त्यामुळे अशी मंडळी पक्षात काही पद मिळते का? याचा शोध घेताना दिसत आहे. तसेही काही दिवसांपासून भारतीय जनता युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष म्हणून पप्पू चव्हाण यांच्या सत्काराचे कार्यक्रम होत आहेत. मात्र तसे पत्र काढून पक्षाने काही घोषणा केली नाही. जुने जिल्हाध्यक्ष गणेश बांगर यांनाही याबाबत कल्पना नसल्याचे ते सांगतात. त्यामुळे आधीच भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, हेच ठरत नसताना व पक्षाला जिल्हाध्यक्षच नसताना झालेला हा बदल भाजपमधील नव्या वादाची ठिणगी पाडणारा ठरण्याचे संकेतही देत होता.
जिल्हाध्यक्षपदाच्याच नवनव्या चर्चांमुळे तर आता भाजपमध्ये आपसी वाद उफाळण्याचीही चिन्हे निर्माण झाली होती. यामध्ये पूर्वी प्रामुख्याने आ. तान्हाजी मुटकुळे, माजी आ. गजानन घुगे, मिलिंद यंबल, फुलाजी शिंदे, शिवदास बोड्डेवार यांची नावे चर्चेत होते. ज्यांनी राजीनामा दिला ते शिवाजी जाधव यांच्यामुळे या चौघांनाही पदाची अपेक्षा निर्माण झाली होती. त्यावरून ते सर्वच जण आपापल्या स्तरावरून प्रयत्नही करताना दिसत होते. त्याचा परिणाम म्हणून मागील काही दिवसांपासून भाजपमधील मंडळीच्या मुंबईच्या वाऱ्या वाढल्या होत्या. आता पुन्हा शिवाजी जाधवच शर्यतीत उतरले होते. शिवाय पक्षाला वेळ देण्याची तयारी दाखवत श्रेष्ठींचे उंबरे झिजवू लागले होते. मात्र भाजप श्रेष्ठींनी रामराव वडकुते यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची टाकून या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे भाजपमध्ये या पदासाठी सुरू असलेली कुतरओढ आता थांबणार आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने पक्षाला जिल्हाध्यक्ष म्हणून प्रभावी चेहरा देणे गरजेचे होते. त्यामुळे माजी आमदार रामराव वडकुते यांच्या रूपाने संयमी चेहरा देऊन भाजपने सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला आहे.