जिल्हा कचेरीसमोर आंदोलकांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 11:45 PM2019-01-25T23:45:45+5:302019-01-25T23:46:27+5:30
प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री आपल्या मागण्यांची दखल घेतली अन् आपल्याला न्याय मिळेल, या अपेक्षेने उपोषण, ठिय्या आंदोलन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यावेळीही दहा ते बारा मंडप जिल्हा कचेरीपुढे पडले असून विविध मागण्यांसाठी उपोषण, ठिय्या आंदोलन सुरू असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री आपल्या मागण्यांची दखल घेतली अन् आपल्याला न्याय मिळेल, या अपेक्षेने उपोषण, ठिय्या आंदोलन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यावेळीही दहा ते बारा मंडप जिल्हा कचेरीपुढे पडले असून विविध मागण्यांसाठी उपोषण, ठिय्या आंदोलन सुरू असल्याचे चित्र आहे.
शासन, प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही बेदखल केली जात असल्याने प्रजासत्ताकदिनी तरी आपल्या मागण्यांकडे कोणी लक्ष देईल, या भाबड्या अपेक्षेने आंदोलन केले जात आहे. १५ आॅगस्ट, १७ सप्टेंबरलाही असेच चित्र असते. यंदाही दुपारपर्यंत जिल्हा कचेरी परिसरात ९ मंडप पडले होते.
कुणाचे सार्वजनिक मागणीसाठी तर कुणाचे वैयक्तिक मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मागील तीन-चार दिवसांपासून रोजच आंदोलनांचा रतिब सुरू असल्याचे दिसून येते. आज त्यात मोठी भर पडली एवढेच. या आंदोलनांमुळे पुढाºयांचीही या ठिकाणी वर्दळ दिसून येत होती.
सातबाराची मागणी
हिंगोली तालुक्यातील घोटा येथील चोखा पुंजाजी येडे व इतरांनी गायरान जमिनीची सातबारा नावावर करून देण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. त्यांनी निवेदनात म्हटले की, १९७८ पासून घोटा देवी येथील शेत सर्वे क्र.११४ या गायरान जमिनीवर ताबा आहे. मात्र त्याची सातबारा नावावर करून दिली नाही. इतर काहींची जमीन नावे करून दिली आहे. त्यामुळे मलाही जमीन नावे करून देण्याची मागणी येडे यांनी केली.
पेरा प्रमाणपत्राची मागणी
सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील गट क्र.१५0 मधील एक हेक्टर ३१ आर व ८0 आर जमिनीबाबत पेरापत्रक देण्याची मागणी बीबी स.मुशीर, ताहेराबी स.निसार, नसरीनबेगम स.रफिक यांनी केली आहे. चालू हंगामात यात सोयाबीन व तूर पेरली. पेरापत्रक देण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयात अर्ज केला. मात्र जायमोका पंचनामा झाला नसल्याने उपोषण करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सावकारीविरुद्ध कारवाई करा
सेनगाव तालुक्यातील कहाकर बु. येथील एका सावकाराच्या घरावर सहायक निबंधक कार्यालयाने छापे मारून अवैध सावकारीबाबत दस्तावेज जप्त केले होते. मात्र नंतर यात अहवाल बदलून सावकाराला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार करून संदीप घनश्याम पोपळघट व सागर घनश्याम पोपळघट यांनी उपोषण सुरू केले. यात कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही त्यांनी निवेदनात केला आहे.
रस्त्यासाठी उपोषण
कळमनुरी तालुक्यातील पार्डी मोड ते डिग्रस कोंढूर रस्त्याची अंत्यत वाईट अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या मागणीसाठी यापूर्वी भजन आंदोलन केले होते. आता पुन्हा एकदा ग्रामस्थ जिल्हा कचेरीसमोर आंदोलनास बसले आहेत. या रस्त्याचा प्रश्न सुटला नसल्याने ग्रामस्थांना ये-जा करणे कठीण झाले असून विद्यार्थीही हैराण असल्याचे निवेदनात म्हटले. जि.प.सदस्य बाळासाहेब मगर व इतरांनी आंदोलनात सहभाग घेतला.
खोका-टपरी युनियनचेही उपोषण
बसस्थानकाच्या बाजूस मोकळ्या जागेवर हातगाडे लावून व्यवसाय करणाºयांना अतिक्रमणात हटविले. मात्र ही मोकळी जागा असल्याने येथे कोणताच अडथळा होत नाही. पर्यायी व्यवस्था करेपर्यंत या जागेवर व्यवसाय करू देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. राजेंद्र दुबे, शे.नजीर अहेमद, म.इफारन अ.रशीद, शंकर गुडमलवार, स.फय्याज, फारुखभाई बर्तनवाले आदींचा यात समावेश आहे.
अभिलेखे देत नसल्याची तक्रार
कळमनुरी तहसील कार्यालयात पातोंडा येथील गट क्रमांक ३७ मधील ४ एकर २0 गुंठे जमिनीबाबत भूमि अभिलेखची प्रत, फेरफार, रजिस्ट्रीची नक्कल मागितली असता ती मिळत नसल्याची तक्रार माधव वाढवे यांनी केली आहे. हिंगोली व कळमनुरी तहसीलमध्ये चालढकल केली जात असल्याने कागदपत्रे देण्याचा आदेश देण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे करून उपोषण सुरू केले आहे.
राज्यात आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगणाºया लोकतंत्र सेनानींना शासनाने मानधन मंजूर केले आहे. मात्र त्यांना अद्याप ही रक्कम मिळाली नाही. आता ९0 टक्के लोकतंत्र सेनानी मरण पावले आहेत. उर्वरित १0 टक्के हयात असून ते न्यायासाठी झगडत आहेत. मात्र केवळ निवडणुका आल्या की, आश्वासने देण्यापलीकडे काहीच होत नसल्याचा आरोप निवेदनात केला. प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यावर निधी जमा होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
या आंदोलनाच्या ठिकाणी लोकप्रतिनिधी व पक्षीय पदाधिकाºयांनीही आज भेटी दिल्या. यातील आंदोलकांच्या भावना जाणून घेत प्रशासनाकडे मांडण्याचे आश्वासन दिले जात होते.