मालवाहतुकीमुळे रापमची एसटी मालामाल ; चालकांच्या खिशाला मात्र कात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:23 AM2021-05-29T04:23:11+5:302021-05-29T04:23:11+5:30
हिंगोली : कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आल्याने एसटी महामंडळाने मालवाहतुकीतून आर्थिक स्त्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. हिंगोली आगाराला ...
हिंगोली : कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आल्याने एसटी महामंडळाने मालवाहतुकीतून आर्थिक स्त्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. हिंगोली आगाराला यातून मागील तीन महिन्यांत ४ लाख २२ हजार ३९१ रुपयांचे उत्पन्न मिळाले. मालवाहतुकीमुळे आर्थिक भर पडत असली तरी चालकांच्या खिशाला मात्र फटका बसत असल्याची ओरड होत आहे.
कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आल्याने एसटी महामंडळाच्या उत्पन्नाचे मार्ग बंद झाले होते. त्यामुळे गतवर्षीपासून एसटी महामंडळाने मालवाहतूकही करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हिंगोली आगाराने मालवाहतूक करण्यासाठी ८ वाहने तयार केली आहेत. एका वाहनातून एकावेळी १० टन मालाची वाहतूक करता येते. माल सुरक्षीत राहण्याची हमी मिळत असल्याने व्यापाऱ्याचा कलही एसटीच्या मालवाहतूक सेवेकडे आहे. १०० किलाेमीटर अंतरासाठी ४६ रुपये, १०० ते २५० किलोमीटर अंतरासाठी ४४ रुपये, तर २५० च्या पुढील अंतरासाठी ४३ रुपये प्रती किलोमीटरप्रमाणे दर आकारला जात आहे. कोरोना काळात हिंगोली आगाराला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आगारप्रमुख प्रेमचंद चौथमल यांनी पुढाकार घेत प्रवासी सेवेबरोबरच मालवाहतूकीचे भाडे मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे. त्यामुळेच कोरोना काळातही मागील तीन महिन्यात ४ लाख २२ हजार ३९१ रुपयांचे उत्पन्न आगाराला मिळाले. एकिकडे मालवाहतुकीतून आगाराला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी कर्मचारी झटत असताना दुसरीकडे चालकांच्या खिशाला मात्र कात्री बसत असल्याची ओरड होत आहे. भाडे घेऊन गेल्यानंतर सहा-सहा दिवस घराबाहेर थांबावे लागत असल्याने खर्च वाढत आहे.
कोरोनाकाळात ४ लाखांची कमाई
१) हिंगाेली आगाराने कोरोना काळात मालावाहतूकीतून मागील तीन महिन्यात ४ लाख २२ हजार ३९१ रूपयांची कमाई केली.
२) मार्च महिन्यात २० भाडे मिळाले होते. यातून १ लाख ८४४ रूपयांचे उत्पन्न मिळाले. यासाठी २ हजार १७६ किलोमीटर वाहन धावले.
३) एप्रिल महिन्यात हिंगोली आगाराला मालवाहतूकीचे २६ भाडे मिळाले. यातून १ लाख २५ हजार ६७२ रूपयांचे उत्पन्न मिळाले. तसेच मे महिन्यात ४१ भाड्यातून १ लाख ९५ हजार ८७० रूपयांचे भाडे हिंगोली आगाराला मिळाले.
परतीचा मालवाहतूक मिळेपर्यंत तेथेच मुक्काम
-प्रवासी वाहतूक करताना फार तर एखादा मुक्काम चालकांचा पडतो. मात्र मालवाहतूक करताना चालकांना किमान दोन दिवसांच्या वरच बाहेर थांबावे लागत आहे.
- त्यात भाडे घेऊन गेल्यानंतर तेथून दुसरे भाडे मिळाल्यानंतरच परत यावे लागत असल्याचा आरोपही होत आहे. मात्र कोरोनामुळे प्रवासी वाहने बंद असल्याने नाईलाजाने चालकांना बाहेर थांबावे लागत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
ॲडव्हान्स मिळतो, पण पगारातून होतो कट
- मालवाहतूकीदरम्यान जेवनाची गैरसोय होऊ नये, म्हणून मालवाहतूक वाहन घेऊन जाणाऱ्या चालकांना किमान ५०० रूपयांचा ॲडव्हान्स मिळतो.
-मालवाहतुकीतून आलेल्या भाड्यातूनही वेळप्रसंगी काही खर्च करण्याची मूभा मिळत असली तरी खर्च केलेल्या पैशांसह भाड्याची रक्कम आगाराकडे जमा करावी लागते.
- खर्च केलेली रक्कम जवळ नसली तर ही रक्कम पगारातून कपात केली जात आहे. त्यामुळे पगारातील रक्कम काटकसर करून खर्च करावी लागत आहे.
चालक म्हणतात...
-मालवाहतुकीतून आगाराला फायदा होत असला तरी यात चालकांचे मोठे नुकसान होत आहे. परत पुन्हा भाडे मिळेपर्यंत पाच-पाच दिवस घराबाहेर थांबावे लागत असल्याने जेवनाची गैरसोय होत आहे. त्यात नाहक खर्च वाढत असल्याचे एका चालकाने सांगितले.
- मालवाहतूक वाहन घेऊन जाताना खर्च करण्यासाठी पैसे दिले जातात. मात्र पुन्हा हे पैसे पगारातून कपात केले जात आहेत. त्यामुळे उरलेल्या पगारातून घर चालविताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे एका चालकाने सांगितले.
प्रतिक्रीया...
भाडे घेऊन जाणाऱ्या चालकांना दोन दिवसांत परत येण्याचे सांगितले जाते. मात्र घेऊन गेलेले मालवाहतूक वाहन तेथील आगारात जमा करून घेतले जात नाही. त्यामुळे चालकांना दुसरे भाडे मिळेपर्यंत तेथेच मुक्काम करावा लागत आहे. खर्चासाठी पैसे दिले जात असले तरी पगारातून कट होतात. त्यामुळे कोरोना काळात चालकांना खर्चाचा नाहक भूर्दंड सहन करावा लागत आहे.
-तान्हाजी बेंगाळ, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, हिंगोली आगार