अतिवृष्टी अनुदानासाठी गोरेगावात रस्ता रोको; शेतकरी संपावर ठाम
By यशवंत भीमराव परांडकर | Published: September 19, 2022 03:38 PM2022-09-19T15:38:59+5:302022-09-19T15:39:46+5:30
सेनगाव तालुक्यातील गोरेगावसह बाभुळगाव आजेगाव व पुसेगाव चार मंडळे अतिवृष्टी अनुदान लाभातुन डावलण्यात आली आहेत
गोरेगाव (जि. हिंगोली) : येथे अतिवृष्टी अनुदानासाठी गेल्या चार दिवसापासून शेतकरी संप सुरू असुन १९ सप्टेंबर रोजी गोरेगावसह परिसरातील शेतकऱ्यांकडून येथील जिजाऊ चौक चौफुली रस्त्यावर जवळपास तासभर रस्ता रोको करण्यात आला.
सेनगाव तालुक्यातील गोरेगावसह बाभुळगाव आजेगाव व पुसेगाव चार मंडळे अतिवृष्टी अनुदान लाभातुन डावलण्यात आल्यामुळे गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर १६ सप्टेंबर पासून शेतकरी संप सुरू असून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केली जात आहेत . तर १९ सप्टेंबर रोजी माजी जि.प. उपाध्यक्ष अनिल पतंगे यांचे नेतृत्वात गोरेगाव येथील जिजाऊ चौक चौफुली रस्त्यावर शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक विष्णुपंत भुतेकर , तंटा मुक्ती अध्यक्ष अमोल खिल्लारी , माजी पं . स . सदस्य अशोक कावरखे , वसीम देशमुख , संतोष काळे , राधेश्याम कावरखे , भीमराव नायक , पं. स . सदस्य किशोर पाटील बाभुळगावकर , केतुल हनवते , अँड. प्रविण नायक आदी सह गोरेगाव , बाभुळगाव , सवना सर्कलच्या शेतकऱ्यांची उपस्थिती होती . मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडत शेतकऱ्यांनी जवळपास तासभर रस्ता रोको आंदोलन केले.
शेतकरी संपावर ठाम ...
गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या सुरू असलेल्या शेतकरी संप आंदोलनास तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी भेट दिली. प्रसंगी विष्णुपंथ भुतेकर यांच्या मध्यस्थीने संप मागे घेण्यासंदर्भात चर्चा झाली असता शेतकऱ्यांनी गोरेगाव येथील पर्जन्यमापक यंत्र गेल्या सात आठ वर्षा पासुन बंद असल्याचे सांगीत चुकीच्या अहवाल सादर करून अतिवृष्टीतुन डावलल्याची तक्रार मांडली.