हिंगोली जिल्ह्यात बंडखोरीतून उफाळली खदखद; मनधरणीसाठी पक्षश्रेष्ठींची कसरत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 11:32 AM2024-11-01T11:32:10+5:302024-11-01T11:33:34+5:30
सर्वच पक्षांत आणि मतदारसंघात बंडखोरी मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे ही बंडखोरी शमविण्यासाठी वरिष्ठांचा कस लागणार आहे.
हिंगोली : उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर या निवडणुकीतील चित्र बऱ्यापैकी समोर आले आहे. विशेष म्हणजे, नाराजांची खदखद बंडखोरीतून दिसून आली आहे. सर्वच पक्षांत आणि मतदारसंघात बंडखोरी मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे ही बंडखोरी शमविण्यासाठी वरिष्ठांचा कस लागणार आहे.
हिंगोलीचा मतदारसंघ काँग्रेसकडून शिंदेसेनेने खेचून घेतल्यानंतर काँग्रेसमधील इच्छुकांनी आघाडी धर्म डावलत उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील यांनी तर शक्तिप्रदर्शन करीत ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. तसेच इतरांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. महायुतीमध्येही भाजपची उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले रामदास सुमठाणकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कळमनुरी मतदारसंघात देखील महाविकास आघाडीतील उद्धव सेनेचे अजित मगर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. वसमत मतदारसंघात देखील महायुतीने राकाँ अजित पवार पक्षाला उमेदवारी दिली असताना भाजपातील मिलिंद यंबल, उज्ज्वला तांभाळे आणि शिंदे सेनेचे तालुकाप्रमुख राजू चापके यांनी बंडखोरी केली आहे.
बुधवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीतून नाराजांची मनमधरणी करण्याचे प्रयत्न केले जातील. काँग्रेसमधील बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न गुरुवारी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केला. हैदराबादहून आ.डॉ. मोहन रेड्डी यांनी उमेदवारी दाखल केलेल्या काँग्रेसमधील नाराजांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला.