औषध दुकानाचा परवाना रद्द करण्याची शिफारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:26 AM2021-04-26T04:26:58+5:302021-04-26T04:26:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री व संख्या यांचा ताळमेळ जुळत नसल्याप्रकरणी हिंगोली शहरातील एका औषध दुकानाचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री व संख्या यांचा ताळमेळ जुळत नसल्याप्रकरणी हिंगोली शहरातील एका औषध दुकानाचा परवाना रद्द करावा, अशी शिफारस जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी औषध प्रशासनाकडे केली आहे.
शासनमान्य तसेच खासगी कोविड केअर सेंटरची अचानक तपासणी करण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाने २३ एप्रिल रोजी शहरातील श्री जगदंब हॉस्पिटल व कोविड सेंटर येथील ११ रूग्णांच्या फाईल तपासल्या. यावेळी दिवेश मेडिकल चालक व फार्मासिस्ट यांनी रूग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची पावती दिली नसल्याचे तसेच रूग्णांची हॉस्पिटल संचिका तपासणी केली असता, इंजेक्शनच्या पावत्या कुठेही आढळल्या नाहीत. इंजेक्शनचा साठा व विक्री केलेल्या संख्येचा ताळमेळ जुळत नसल्याने या मेडिकलचा परवाना रद्द करावा, अशी शिफारस प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या सहा. आयुक्त तथा औषध निरीक्षण अधिकारी ब. दा. मरेवाड यांच्याकडे केली आहे.