हिंगोलीत विक्रमी २० हजार क्विंटल हळदीची आवक, पाचशेंनी घसरला भाव
By रमेश वाबळे | Published: April 15, 2024 06:19 PM2024-04-15T18:19:38+5:302024-04-15T18:24:15+5:30
बाजार समितीच्या मार्केट यार्डात हळदीच्या मोजमापासाठी लागणार चार दिवस
हिंगोली : येथील बाजार समितीच्या हळद मार्केट यार्डात यंदाच्या वर्षातील विक्रमी आवक १५ एप्रिल रोजी झाली. तब्बल २० हजार क्विंटल हळद विक्रीसाठी आली असून, मार्केट यार्ड आवारासह बाहेरील रस्त्यावर वाहनांची एक ते दीड कि.मी.पर्यंत रांग लागली. या सर्व हळदीचे मोजमाप करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, क्विंटलमागे भावात जवळपास पाचशे रुपयांची घसरण झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
मराठवाड्यासह विदर्भात हळद खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात विक्रमी आवक होऊ लागली आहे. १५ एप्रिल रोजी भावात क्विंटलमागे जवळपास पाचशे रुपयांची घसरण झाली तरी सध्या मिळणारा भाव समाधानकारक आहे. त्यामुळे हळद तयार होताच शेतकरी मार्केट यार्डात विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे आवक वाढत आहे.
१४ एप्रिल रोजी मार्केट यार्ड रविवारच्या नियमित सुटीमुळे बंद होते. परंतु, सोमवारी खरेदी-विक्री होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी रविवारीच हळद घेऊन मार्केट यार्ड जवळ केले. त्यामुळे रात्री ८ वाजेपर्यंत मार्केट यार्डात वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक नव्हती. परिणामी, नंतर आलेल्या वाहनांना मार्केट यार्डाबाहेरील रेल्वे स्टेशन रोडवर वाहने उभी करावी लागली. सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत जुने पोलिस अधीक्षक कार्यालय, जुन्या शासकीय रुग्णालयापर्यंत वाहनांची रांग लागली होती.
दररोज ५००० क्विंटलचा काटा...
मार्केट यार्डातील मनुष्यबळानुसार दररोज पाच हजार क्विंटलचा काटा होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या हळदीचे लवकर मोजमाप व्हावे यासाठी बाजार समितीचा प्रयत्न असतो. परंतु, विक्रमी आवक होत असल्यामुळे उशीर लागत असल्याचे चित्र चित्र आहे. सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत जवळपास २० हजार क्विंटलची आवक झाल्याने मोजमापासाठी चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.