हिंगोलीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील रेकॉर्ड रूम जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:35 PM2018-07-25T12:35:52+5:302018-07-25T12:38:39+5:30
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या रेकॉर्ड रुमला आज पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास भीषण आग लागली.
हिंगोली : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या रेकॉर्ड रुमला आज पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत वाहनांच्या नोंदणीचा दस्तावेज जळून खाक झाला आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.
येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीनजीक औंढा नागनाथ मार्गावर आहे. जुन्या इमारतीत या कार्यालयाचा कारभार चालतो. या कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. ३१ मे २0१८ रोजी ती उपप्रादेशिकला हस्तांतरित होणार होती. मात्र अजूनही तारीख पे तारीखच सुरू आहे. त्यातच बुधवारी पहाटे जुन्या कार्यालयात आग लागली. या कार्यालयाच्या मागेच एकजण निवासी आहे. त्याने परिवहनच्या अधिकाऱ्याना कळविले. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी मुख्याधिकारी रामदास पाटील, पोलीस निरीक्षक मारोती थोरात यांच्यासमवेत घटनास्थळ गाठले. या दरम्यान अग्निशामकचे वाहनही घटनास्थळी पोहोचले होते. अर्ध्या तासांत आग विझविण्यात आली.
संचिका जळाल्या
यात वाहनांच्या नोंदणी, कर भरणा पावत्या आदींच्या संचिका ठेवलेल्या होत्या. यात नोंदणीच्या शेकडो संचिका जळाल्याचे संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर तीन संगणक, फर्निचर जळाल्याने नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र नेमके कारण अजून समजले नाही.
दस्तावेज ऑनलाईनवर उपलब्ध
याबाबत विचारले असता परिवहन अधिकारी पवार यांनी सांगितले की, या आगीत वाहन नोंदणीच्या संचिका जळाल्या. मात्र हा दस्तावेज आॅनलाईनवर उपलब्ध असतो. त्यामुळे त्याची एवढी अडचण नाही. महत्त्वाच्या अनेक संचिकांना धक्का लागला नसल्याचे ते म्हणाले.