'पुनर्वसन करा, अन्यथा आत्मदहनाशिवाय पर्याय नाही!'; अतिक्रमणधारकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 01:56 PM2020-02-13T13:56:15+5:302020-02-13T14:16:22+5:30
जलेश्वर तलाव परिसरातील नागरिकांचे पुनर्वसन करून देण्यात येईल, त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे हिंगोली नगरपालिकेकडून अतिक्रमणधारकांना आश्वासन दिले होते.
हिंगोली : शहरातील जलेश्वर तलावाकाठावील अतिक्रमण धारकांना महसूल प्रशासनाच्या वतीने नोटिस बजावल्या आहेत. जलेश्वर तलावाच्या सुशोभिकरणासाठी अडसर ठरत असलेले अतिक्रमणे प्रशासनाकडून पाडली जाणार आहेत. सदर कार्यवाहीसाठी प्रशासनाकडून नियोजनही सुरू आहे. तलावाच्या काठावरील १९५ जणांना नोटिस दिल्या आहेत. परंतु आमचे पुनर्वसन करा नंतरच अतिक्रमण हटविण्यात यावे या मागणीसाठी १३ फेबु्रवारी रोजी येथील नागरिकांनी प्रथम भाजपा कार्यालय व त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
‘जलेश्वर’ तलावाच्या काठची अतिक्रमणे हटविणार !
हिंगोली शहरातील जलेश्वर तलाव परिसरातील अतिक्रमणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे १३ फेबु्रवारी रोजी नागरिकांनी प्रथम भाजप कार्यालयात जाऊन आ. तान्हाजी मुटकुळे यांची भेट घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अतिक्रमणधारक एकत्रित जमले होते. आमचे पुनर्वसन करून द्यावे, त्यानंतरच अतिक्रमण हटवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
जलेश्वर तलाव परिसरातील नागरिकांचे पुनर्वसन करून देण्यात येईल, त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे हिंगोली नगरपालिकेकडून अतिक्रमणधारकांना आश्वासन दिले होते. शिवाय पर्यायी जागेचा प्रस्तावही जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. परंतु अद्याप त्यावर ठोस कुठलाच निर्णय लागला नाही. त्यात महसूल प्रशासनाकडून वारंवार अतिक्रमण स्वत:हून काढून घ्यावेत अशा सूचना देऊन नोटिसाही देण्यात आल्या. परंतु कोणीही अतिक्रमण काढून घेतले नसल्यामुळे आता अतिक्रमणे हटविण्याच्या जलदगतीने कार्यवाही सुरू असून याबाबत प्रशासनातर्फे याबाबत वेळोवेळी बैठका घेतल्या जात आहेत. त्यामुळे जलेश्वर तलावाकाठावरील अतिक्रमण हटणार हे निश्चित झाले आहे. असे असले तरी येथील नागरिक पुनर्वसनाची मागणी करीत आहेत. बेघर झाल्यास आम्ही जावे कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परंतु सदर अतिक्रमण हटविण्याची तयारी मात्र प्रशासनाकडून सुरू आहे.