मृतदेह बाहेर काढताच नातेवाईकांचा टाहो...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:55 AM2019-09-10T00:55:01+5:302019-09-10T00:55:19+5:30
हिंगोली तालुक्यातील देवठाणा भोयर येथील युवक टनका येथील पैनगंगा नदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पाण्याबाहेर काढला. तो पाहताच नातेवाईकांनी एकच टाहो फोडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कनेरगावनाका: हिंगोली तालुक्यातील देवठाणा भोयर येथील युवक टनका येथील पैनगंगा नदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पाण्याबाहेर काढला. तो पाहताच नातेवाईकांनी एकच टाहो फोडला.
शंकर भोयर हा काका व मित्रासोबत रविवारी सकाळी व्यायाम करून कापूरखेडा जवळील पैनगंगा नदीवर पोहण्यास गेला होता. पोहत असताना तो पाण्यात बुडाला. सोबतच्यांनी त्याला वाचविण्याचे प्रयत्न केले, पण पाण्याच्या प्रवाहात तो खोलवर बुडाला. परिसरातील पैनगंगा नदीवर गर्दी केली होती. रविवारी दिवसभर व रात्री उशिरापर्यंत शोध सुरूच होता. बचाव पथक पहिल्या दिवशी वापस गेले व दुसºया दिवशी पथक घटनास्थळी दाखल झाले. अन् शोधकार्यास पुन्हा सुरूवात केली. यावेळी शंकरचा मृतदेह पाण्यात आढळून आला. ज्या ठिकाणावरून शंकरने पाण्यात उडी मारली होती त्याच परिसरात जवळपास ३० फूट पाण्यात खोलवर त्याचा मृतदेह खड्ड्यात फसलेला होता. बचाव पथकाच्या अथक परिश्रमानंतर शंकरचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. यावेळी नातेवाईकांनी शंकरचा मृतदेह पाहताच टाहो फोडला. घटनास्थळी आ. तान्हाजी मुटकुळे यांच्यासह ग्रामीण पोलीस ठाण्याचे अंगद सुडके व वाशिम ग्रामीणचे पोलीस कर्मचारी तैनात होते. दोन दिवस पाण्यात शंकरचा मृतदेह असल्याने तो छिन्न- विच्छिन्न झाला होता. त्यामुळे घटनास्थळी शवविच्छेदन केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
शंकरला डोळे भरून पाहण्यासाठी ग्रामस्थांच्या नजरा लागल्या होत्या. शंकर उत्कृष्ट कुुुस्तीपटू होता, तो नेहमीच व्यायाम व पोहण्यासाठी नदीकाठी येत असे. वाशिम जिल्ह्यातील पिंजर येथील संत गाडगेबाबा आपातकालीन शोध-बचाव पथकाने शंकरचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पथक प्रमुख दीपक सदाफळे व त्यांच्या सात सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. स्थानिक प्रशासन असतानाही आधार मात्र एका सेवाभावी संस्थेचा घ्यावा लागला. त्यामुळे आपातकालीन घटना घडल्यास प्रशासकीय यंत्रणा किती तत्पर आहे, हे यावेळी दिसून आले. ९ सप्टेंबर रोजी शोकाकुल वातावरणात मयत शंकर भोयर यांच्या पार्थिवावर देवठाणा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.