शेतकऱ्यांना दिलासा! महिनाभरानंतर हिंगोलीत धुवॉंधार पाऊस
By विजय पाटील | Published: September 5, 2022 02:45 PM2022-09-05T14:45:12+5:302022-09-05T14:45:33+5:30
ऑगस्ट महिन्यात मात्र अधून-मधून तुरळक ठिकाणी पडणाऱ्या पावसाच्या सरी वगळता एकही मोठा पाऊस झाला नाही.
हिंगोली : मागील महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने ५ सप्टेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास धुवाँधार बरसत शेतकऱ्यांना दिलासा दिला. यामुळे पिकांना जीवदान मिळणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात जुलै महिन्यात अनेकदा अतिवृष्टी झाली. ऑगस्ट महिन्यात मात्र अधून-मधून तुरळक ठिकाणी पडणाऱ्या पावसाच्या सरी वगळता एकही मोठा पाऊस झाला नाही. दुसरीकडे उन्हाचा कडाका मात्र वाढला होता. वाढत्या उकाड्याच्या त्रासाने जनता हैराण होती. तर पावसाअभावी पिके वाळू लागली होती. सर्वाधिक पेरा असलेल्या सोयाबीनचे तर मोठे नुकसान होत होते. पकत असलेल्या शेंगा गळू लागल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा होती. या पावसाने ही अपेक्षा पूर्ण होणार आहे.
हिंगोलीसह कनेरगाव, डिग्रस कऱ्हाळे आदी भागात पाऊस झाला. कळमनुरी, आखाडा बाळापूर, जवळा पांचाळ या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. वसमत तालुक्यातील कौठा, कुरुंदा, आंबा आदी भागात पाऊस झाला. औंढ्यासह तालुक्यातील शिरड शहापूर परिसरातही पावसाने हजेरी लावली.