आरटीओ कार्यालयात एजंटांचे प्रतिनिधी उभे राहतात खिडकीजवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:33 AM2021-08-19T04:33:04+5:302021-08-19T04:33:04+5:30
काम लवकर व्हावे म्हणून अनेक जण जातात एजंटांकडे ...
काम लवकर व्हावे म्हणून अनेक जण जातात एजंटांकडे हिंगोली: प्रादेशिक परिवहन कार्यालयात ऑनलाईन प्रक्रिया झाली असली तरी अनेक जण मात्र अजूनही एजंटांमार्फत कामे करुन घेत आहेत. दोन पैसे जास्त दिल्यानंतर कामे सुकर आणि लवकर होतात, असे अनेकांना वाटत आहे. परंतु, जो वेळ ऑफलाईन प्रक्रियेला लागत होता तोच वेळ आजही प्रतिनिधीमार्फत गेल्यानंतर लागतो हे कोणाच्याही लक्षात येत नाही. अशिक्षित माणसाने एजंटांकडे जाणे योग्य आहे. पण शिक्षित माणसे का एजंटांकडे जातात हे कळायला मार्ग नाही.
सर्व सुविधा ऑनलाईन झाल्या तरी....
वाहन फिटनेस सर्टिफिकेटवाहन फिटनेस सर्टिफिकेट हे ऑफलाईन राहिले नाही. वाहन फिटनेस सर्टिफिकेट ऑनलाईन मिळू शकते. परंतु, अजूनही अनेक जण एजंटांकडे चकरा मारताना दिसत आहेत.
पर्मनंट लायसन्स
सर्व सोयीसुविधा ऑनलाईन झालेली असतानाही एजंटांकडून काम करुन घेण्यासाठी अनेक तत्पर असतात. दोन पैसे जास्त देवून काम लवकर होते म्हणून पर्मनंटला लागणारी कागदपत्रे एजंटांकडे देतात.
गाडी दुसऱ्याच्या नावावर करणे
गाडी दुसऱ्याच्या नावावर करण्यासाठी टू व्हिलरला ४०० रूपये तर चारचाकीला ५०० रुपये लागतात. परंतु,काही जण एजंटांना जास्तीचे पैसे देवून गाडी नावावर करताना येत आहेत.
अधिकारी म्हणतात...
आरटीओ कार्यालयात सर्व कारभार ऑनलाईन झाला आहे. त्यामुळे एजंटांना आरटीओ कार्यालयात परवानगी नाही. खिडकी जवळ येऊन ते कामे करु शकतात. एजंटांसाठी कार्यालयात विविध खिडक्यांची सुविधा करुन देण्यात आली आहे. सर्व कामकाज नियमाप्रमाणे होतो.
-अनंता जोशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
२५ ते ३० एजंटांचा गराडा....
आरटीओ कार्यालयाच्या समोर २५ ते ३० एजंटांनी आपले बस्तान मांडलेले आहे. आरटीओ कार्यालयातील सर्व व्यवहार ऑनलाईन झालेला असताना अनेक जण काम लवकर होते म्हणून एजंटांकडे जावून जास्तीचे पैसे देत आहेत.
ऑनलाईन कामे वेळेवर होत नाहीत...
शासनाने लायसन्स व इतर कामे ऑनलाईन केले असले तरी कधी लाईन सुरु असते तर कधी सुरु होत नाही. त्यामुळे एजंटांकडे जावे लागत आहे. इंटरनेट चालू होत नसल्यामुळे एजंटांकडे जावे लागत आहे, असे काही लाभार्थिनी सांगितले.
काम लवकर होते म्हणून एजंटांकडे
ऑंनलाईन कारभार झाला असला तरी काम वेळेवर होते म्हणून एजंटांकडे जावे लागत आहे. दोन पैसे गेले तरी चालेल म्हणून एजंटांचे दुकान गाठतो, असे एका लाभार्थ्याने सांगितले.
कार्यालयात काम वेळेवर झाले असते तर एजंटांकडे जायचे कारण नाही. परंतु, ऑनलाईन काम होत नाही, कार्यालयात दाद दिली जात नाही म्हणून एजंटांकडे जावे लागते, असे लाभार्थिनी सांगितले.
वेळ नाही म्हणून तर एजंटांकडे जावे लागते...
नागरिकांची कामे वेळेवर व सुकर व्हावीत म्हणून ऑनलाईन सुविधा केली असली तरी एजंटांची दुकाने काही कमी झाली नाहीत. कामे वेळेवर होतात म्हणून एजंटांकडे जातो. एजंटांना प्रमाणपत्र देवून जास्तीचे पैसे दिले की एजंट कामे वेळेवर करतात.