"आरक्षण हक्काचं आहे आणि ते घेतल्याशिवाय मराठे शांत बसणार नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 03:35 PM2024-07-07T15:35:27+5:302024-07-07T15:35:40+5:30

मनोज जरांगे यांचे मत; हिंगोलीत माध्यमांशी साधला संवाद.

Reservation is a right and the Marathas will not rest until it is taken | "आरक्षण हक्काचं आहे आणि ते घेतल्याशिवाय मराठे शांत बसणार नाहीत"

"आरक्षण हक्काचं आहे आणि ते घेतल्याशिवाय मराठे शांत बसणार नाहीत"

लोकमत न्यूज नेटवर्क, हिंगोली : आरक्षणासाठी आत्तापर्यंत मराठ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलने केली असून, स्वत:च्या लेकराबाळांना न्याय मिळावा, यासाठी हा शांततेच्या मार्गाने केलेला आक्रोश आहे. आरक्षण हक्काचं असून, ते घेतल्याशिवाय आता मराठे शांत बसणार नाहीत, असे मत मनोज जरांगे - पाटील यांनी हिंगोलीत व्यक्त केले.

मराठा आरक्षण शांतता संवाद रॅलीच्या निमित्ताने जरांगे ६ जुलै रोजी हिंगोलीत आले होते. दुसऱ्या दिवशी ७ जुलै रोजी सकाळी ९:३० वाजता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आरक्षण हे मराठा समाजाच्या हक्काचे असून, त्यासाठी आमचा लढा सुरू आहे. मराठा कुणबीच्या तब्बल ५७ लाख नोंदी सापडल्या आहेत. प्रारंभापासून मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी आहे. यात ओबीसी बांधवांवर कुठलाही अन्याय होणार नाही. जर नोंदी सापडल्या आहेत तर फुकट भांडण कशासाठी, असे आता ओबीसी बांधवांनाही वाटत असून, छगन भुजबळांची भूमिका त्यांनाही पटत नसल्याचे जरांगे म्हणाले.
मराठा समाज कधीच कोणावर रूसला नाही. आरक्षणाची मागणी हक्काची असून, ती सरकारने समजून घेणे गरजेचे आहे आणि ते समजून घेतील, असा विश्वास आहे. परंतु, मराठा आरक्षण प्रश्नी चालढकल केली तर सरकारला ते जड जाईल, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

आत्महत्या करू नका...
आरक्षण आपल्या हक्काचं असून, ते आज ना उद्या मिळणारच आहे. परंतु, तरुणांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलू नये. तुम्हीच जर आत्महत्या करीत असाल तर आरक्षण मागायचं कुणासाठी? आपल्या आत्महत्येमुळे अख्खं कुटुंब उडघ्यावर येते, त्यांचा विचार आपण करायला हवा. आरक्षणासाठी यापेक्षाही मोठा लढा उभारायची ताकद मराठा समाजात आहे. त्यामुळे कुणीही आत्महत्या करू नये, असे आवाहनही जरांगे यांनी केले.

Web Title: Reservation is a right and the Marathas will not rest until it is taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.