हिंगोली जिल्ह्यात ५७ महिला बचत गटांना स्वस्त धान्य दुकानांचे परवाने बहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 04:10 PM2018-09-20T16:10:46+5:302018-09-20T16:15:17+5:30
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर महिला बचतगटांना स्वस्त धान्य दुकानांचे परवाने बहाल झाले आहेत.
हिंगोली : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर महिला बचतगटांना स्वस्त धान्य दुकानांचे परवाने बहाल झाले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील ५७ महिला बचत गटांना परवाने देण्यात आले आहेत. आता यात १७ परवाने वसमत तालुक्यातील आहेत.
महिला ग्रामसभेचा ठराव झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने परवान्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याने परवाना प्राप्त बचतगटांना आता महिला ग्रामसभेच्या अग्नीपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. स्वस्त धान्य दुकान व रॉकेल वितरणाचे परवाने महिला स्वयंसहाय्यता देण्याचा प्रश्न प्रदीर्घ काळापासून धूळ खात पडला होता. बचत गट प्रस्ताव दाखल करून पुरवठा विभागाकडे चकरा मारून थकले होते. मात्र या ना त्या कारणाने परवाने मंजुरीचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. अखेर तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण यांनी ५७ बचत गटांना परवाने प्रश्न निकाली काढला आहे. जिल्हाभरातील ५७ रेशन दुकानांचे परवाने महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना देण्यात आले आहेत.
शासन निर्णयाप्रमाणे महिला ग्रामसभा बोलावून निवड केलेल्या बचत गटास महिला ग्रामसभेची आहे किंवा नाही. याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास गटविकास अधिकाऱ्यांमार्फत सादर करावयाचा आहे. त्यानंतरच निवड झालेल्या बचत गटांना स्वस्त धान्य दुकानाच्या परवान्यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. यात महिला ग्रामसभेची मंजुरी व शिफारस आहेत की नाही, हे महिला ग्रामसभा घेवून अहवाल पाठवा, असे सुचित केले आहे. यावरून आता महिला ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे व ग्रामसभेची मंजुरी मिळाल्याशिवाय परवाना मिळण्याचा मार्ग बंद होणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निवड झालेल्या बचत गटांना पुन्हा एकदा अस्वस्थता आहे. कारण प्रस्ताव पाठवून मंजुरी मिळेपर्यंत अत्यंत गोपनियता पाळल्या गेली होती.
आता जर महिला ग्रामसभेने शिफारस नाकारली तर केलेली धडपड व्यर्थ जाणार हे निश्चित आहे. वसमत तालुक्यातील कुरूंदा-येथील केरोसीन परवाना किसान स्वयंसहाय्यता बचत गट, हयातनगर-रमाबाई महिला बचत गट, आरळ-शाहू फुले आंबेडकर महिला बचतगट, सिंगी- जय भवानी महिला बचत गट, किन्होळा- विश्वशांती महिला बचतगट, मरसुळवाडी- तुळजाभवानी बचतगट, हापसापूर- सुजाता बचतगट, भेंडेगाव- जयशिवा आदर्श बचतगट, बोराळा- समता बचत गट, पांगरा शिंदे- भाग्यलक्ष्मी बचतगट, खुदनापूर- महारुद्र बचतगट, पारवा पळसगाव- ग्रामपंचायत कार्यालय पारवा, वाघी- ग्रामपंचायत वाघी, माटेगाव- सरस्वती महिला बचतगट या १७ गावांचा समावेश आहे.
ग्रामसभेसमोर पात्रता मांडावी लागेल
वसमत तालुक्यातील महत्त्वाच्या गावांचे स्वस्तधान्य व रॉकेल वितरणाचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडलेले होते. ते आता बचतगटांच्या माध्यमातून मंजूर झाले आहेत. ज्या बचत गटांना हे परवाने मंजूर झाले आहेत, ते बचतगट ज्येष्ठ, वर्धन्यक्षम, नियमित कार्यरत असावेत, अंतर्गत व्यवहार पारदर्शक असावेत, दरवर्षी लेखापरिक्षण झालेले असावे, हिशेब व लेखे अद्ययावत असावेत, ही पात्रता व निकष आहेत. महिला ग्रामसभेसमोर बचत गटाच्या ही सर्व पात्रता मांडावी लागणार आहे. ग्रामसभेत हे सर्व पाहूनच मंजुरीची शिफारस होणार असल्याने धाकधूक वाढली आहे.
मंजुरी असणे अत्यावश्यक
वसमत तालुक्यातील १७, हिंगोली १२, कळमनुरी १६, सेनगाव ७ तर औंढ्याचे ५ बचत गटांचा समावेश आहे. निवड झालेल्या बचत गटांना संबंधित गावांच्या महिला ग्रामसभेची शिफारस व मंजुरी असणे अत्यावश्यक आहे.