जीर्णोद्धार समिती केवळ बांधकामापुरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:43 AM2019-01-15T00:43:03+5:302019-01-15T00:44:45+5:30
तालुक्यातील नर्सी नामदेव येथील नामदेव महाराजांच्या मंदिर बांधकामासाठी निर्माण करण्यात आलेली जीर्णोद्धार समिती ही केवळ बांधकाम पूर्ण करण्यासाठीच आहे. १५ फेब्रुवारी २0१९ पर्यंत त्यांनी बांधकाम करून मंदिराचा पदभार मूळ विश्वस्त समितीकडे देण्याचा आदेश धर्मादाय सहआयुक्त (मुंबई) यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील नर्सी नामदेव येथील नामदेव महाराजांच्या मंदिर बांधकामासाठी निर्माण करण्यात आलेली जीर्णोद्धार समिती ही केवळ बांधकाम पूर्ण करण्यासाठीच आहे. १५ फेब्रुवारी २0१९ पर्यंत त्यांनी बांधकाम करून मंदिराचा पदभार मूळ विश्वस्त समितीकडे देण्याचा आदेश धर्मादाय सहआयुक्त (मुंबई) यांनी दिला आहे.
मंदिराचे व्यवस्थापन हे संत नामदेव मंदिर ट्रस्ट नोंदणी क्र.ए-१२७४ मार्फत चालविण्यात येत होते. परंतु यात अंतरिम समिती निर्माण झाली होती. त्यात केलेल्या अपिलात व्यवस्थापन मंदिराकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते. ही याचिका प्रलंबित असताना जीर्णोद्धार समितीने धर्मादाय आयुक्त हिंगोली यांची परवानगी न घेता मंदिर बांधकाम सुरू केले होते. ६0 टक्के काम झाल्यावर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मूळ समितीकडे व्यवस्थापन गेल्याने जीर्णोद्धार समितीच्या सदस्यांनी सहायक धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीस अर्ज दिला. त्यानुसार आयुक्तांनी नोंदणीही केली. मात्र मंदिर बांधकामच नव्हे, तर मंदिर व्यवस्थापनावरच कब्जा करण्याचा घाट घातला जात असल्याचे अपील मूळ विश्वस्त सचिव सुभाष हुले यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केले. त्याला मुंबईत आयुक्तांकडे आव्हान दिले होते. हुले यांचे अपील नामंजूर केले. परंतु सदर समिती केवळ बांधकामापुरती असून ते पूर्ण होताच मूळ विश्वस्तांना कारभार द्यावा, असा आदेश दिला. यात विश्वस्तांतर्फे अॅड.पी.के.पुरी, अॅड. लोंढे यांनी बाजू मांडली.