शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन पूर्ववत सुरू ठेवा,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:31 AM2021-02-16T04:31:10+5:302021-02-16T04:31:10+5:30
राजीव सातव यांनी केली ऊर्जामंत्र्यांकडे मागणी हिंगोली : वीजबिल वसुलीसाठी सक्ती न करता शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन पूर्ववत सुरू ठेवण्याची ...
राजीव सातव यांनी केली ऊर्जामंत्र्यांकडे मागणी
हिंगोली : वीजबिल वसुलीसाठी सक्ती न करता शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.
सध्या जिल्ह्यात रबीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना खरिपात मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसे राहिले नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. काहीतरी पर्याय करून शेतकऱ्यांनी रबी हंगामातील गहू, हरभरा, भुईमुगाची पेरणी केली आहे. या पिकांचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. मात्र महावितरणकडून वीजबिल वसुलीसाठी सक्ती केली जात आहे. शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीज तोडली जात आहे. यासाठी शेतकऱ्यांना चालू बिलातील रक्कमेचा भरणा करून थकबाकीसाठी काही काळाची सवलत दिल्यास शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळणार आहे. अन्यथा खरिपाप्रमाणेच शेतकऱ्यांचे रबी हंगामाचेही नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना पूर्ण बिल भरण्यासाठी सक्ती करू नये. वीजबिल वसुलीसाठी सक्ती न करता शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन पूर्ववत सुरू ठेवावे, अशी मागणी खासदार सातव यांनी ऊर्जामंत्र्यांकडे निवेदनाद्वारे आहे.