जिल्ह्यातील निर्बंध पूर्णत: मागे घ्यावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:37 AM2021-06-09T04:37:23+5:302021-06-09T04:37:23+5:30
हिंगोली: जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना अवलंबिल्यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कडक निर्बंध उठवावेत, ...
हिंगोली: जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना अवलंबिल्यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कडक निर्बंध उठवावेत, अशी मागणी हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राज्य शासनाने ऑनलॉक प्रक्रिया राबविण्यासाठी ५ टप्पे व निकष जाहीर केले आहेत. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा ३ जून रोजी पॉझिटिव्हिटी रेट ४.३७ असून ५ टक्केच्या खाली आहे. भरलेले ऑक्सिजन बेडचे प्रमाण २९.३४ टक्के असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने शासनाकडे पाठविली आहे. शासनाच्या नियमावलीनुसार हिंगोली जिल्हा दुसऱ्या टप्प्यात बसतो. असे असतानाही शासनाने हिंगोली जिल्ह्याला तिसऱ्या टप्प्यात बसविले आहे. नंदुरबार जिल्ह्याचा पण हिंगोली एवढाच दर असताना दुसऱ्या टप्प्यात असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढताना पॉझिटिव्हिटी रेट व व्यापलेला ऑक्सिजन बेडची टक्केवारी नमूद करूनच आदेश काढले आहेत. परंतु, आपल्याकडे अशी सरासरी नमूद केलेली नाही. आरोग्य विभागानेही प्रसिद्ध केलेल्या पॉझिटिव्हिटी रेट व व्यापलेल्या ऑक्सिजन बेडची टक्केवारी व एकूण ऑक्सिजन बेडच्या आकड्यात तफावत असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. तसेच आरोग्य विभाग दररोजच्या अहवालात आरटीपीसीआरद्वारे तपासलेल्यांची संख्या नमूद करीत नाही. त्यामुळे पारदर्शकता दिसत नसल्याचा आरोप व्यापारी संघटनेने केला आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हिटी रेट हा पाच टक्केच्या आत व ऑक्सिजन बेड २५ टक्केच्या आत भरलेले असल्याने शासनाच्या नवीन नियमावलीप्रमाणे पहिल्या टप्प्यात समाविष्ट असून जिल्ह्यातील कोरोनाविषयक संपूर्ण निर्बंध उठवावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर आ. तानाजी मुटकुळे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, नंदकिशोर तोष्णीवाल, हमीद प्यारेवाले, प्रशांत सोनी, सुमित चौधरी, प्रफुल्ल भारुका, रवींद्र सोनी, सागर दुबे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो