जिल्हा वर्षिक योजनेत निधी वापरावरील बंधने शिथील, जिल्हा परिषदेला मिळणार ८० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:28 AM2020-12-31T04:28:59+5:302020-12-31T04:28:59+5:30
हिंगोली : जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वापरावरील निर्बंध उठविण्यात आले असून, जिल्हा परिषदेला आता विविध योजनांमध्ये सर्वसाधारणमधूनच जवळपास ४९ ...
हिंगोली : जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वापरावरील निर्बंध उठविण्यात आले असून, जिल्हा परिषदेला आता विविध योजनांमध्ये सर्वसाधारणमधूनच जवळपास ४९ कोटी रुपये मिळणार आहेत. समाजकल्याणचे २० कोटी रुपये मिळतील याशिवाय दहा कोटींच्या आसपास रक्कमही मिळणार असून, एकूण ८० कोटी रुपयांपर्यंत निधी मिळणार आहे.
वार्षिक योजनेवरील खर्चाला निर्बंध आल्यानंतर हिंगोली जिल्हा परिषदेतील विकासकामांना ‘ब्रेक’ लागण्याची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र, हे निर्बंध उठल्याने आता सगळ्यांनाच दिलासा मिळाला आहे. सर्वसाधारणच्या आराखड्यात ४९ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. याशिवाय विशेष घटक व आदिवासी उपयोजनेतही निधी मिळणार आहे. हा सर्व निधी ८० कोटींच्या आसपास जाणार असून, दलित वस्ती सुधारणेलाच २० कोटी रुपये मिळणार आहेत.
निधी खर्चाबाबत प्रस्ताव सादर
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी सादर केलेले प्रस्ताव हे मोठ्या रकमेचे होते. मात्र, त्यासाठी रक्कम गतवर्षीच्या तुलनेत मिळाली आहे. आरोग्य २१.०५ कोटी, पशुसंवर्धन २.५ कोटी, महिला व बालकल्याण ९.६६ कोटी, शिक्षण १३.१० कोटी, लघुपाटबंधारे १३.४३ कोटी, बांधकाम ७५ कोटी, पंचायत ७ कोटी, पाणीपुरवठा व स्वच्छता ३२ कोटी असे प्रस्ताव सादर केले होते. यापैकी ४९ कोटींचे प्रस्ताव सर्वसाधारणमधून मंजूर झाले आहेत.