हिंगोलीत किरकोळ व्यापाऱ्यांनी केले भिक मांगो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 05:16 PM2019-07-12T17:16:49+5:302019-07-12T17:18:33+5:30
व्यापाऱ्यांनी जागेच्या मागणीसाठी केले आंदोलन
हिंगोली : शहरातील रामलीला मैदान येथील किरकोळ व्यापाऱ्यांची दुकाने प्रशासनाकडून हटविण्यात आली. परंतु, पर्यायी जागा बाजारासाठी उपलब्ध करून देण्यात आली नाही. याबाबत प्रशासनाकडे वारंवार विनंती करूनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे या व्यापाऱ्यांनी शुक्रवारी (दि. १२ ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भिक मांगो आंदोलन केले.
व्यापाऱ्यांना पर्यायी व्यवस्था करून देत जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच भाडेतत्वावर रामलीला मैदानाचा वापर संबधित व्यापाऱ्यांना करून देण्यासाठी परवानगी देण्यात यावी किंवा शहरात मध्यभागी, इतरत्र कोणत्याही ठिकाणी दुकाने उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किरकोळ व्यापाऱ्यांनी भिक मांगो मोर्चा व बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. मागण्यांसंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अॅड. विजय राऊत, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने किरकोळ व्यापारी सहभागी होते.