कर्जाची परतफेड होत नसल्याने सेवानिवृत्त पोलिसाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2021 15:42 IST2021-10-16T15:41:50+5:302021-10-16T15:42:46+5:30
Retired policeman commits suicide : कर्ज असल्यामुळे ते सध्या मानसिक तणावात हाेते

कर्जाची परतफेड होत नसल्याने सेवानिवृत्त पोलिसाची आत्महत्या
बासंबा (जि. हिंगोली) : हिंगोलीलगत बळसाेंड भागातील माऊलीनगरमधील उत्तम काळे (५९) या सेवानिवृत्त पाेलीस कर्मचाऱ्याने कर्जाची परतफेड हाेत नसल्याने, गळफास घेऊन आत्महत्या केली (Retired policeman commits suicide) . ही घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे.
सेवानिवृत्त पाेलीस उत्तम काळे हे १४ ऑक्टोबर राेजी सकाळी फिरण्यासाठी गेले. मात्र, उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे त्यांचा मुलगा व परिवाराने त्यांचा इतरत्र शोधाशोध केली, परंंतु त्यांचा शोध लागला नाही. शुक्रवारी सकाळी त्यांनी एका शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
उत्तम काळे यांच्यावर कर्ज असल्यामुळे मानसिक तणावात हाेते, तसेच ते सेवानिवृत्त झाल्याने त्यांची सेवानिवृत्तीचे काही रक्कम मिळणार होती. ती न मिळाल्यामुळे व कर्जाच्या हप्त्याची वेळेवर परतफेड हाेत नसल्याने तणावात येत त्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी वाशिम येथील खासगी फायनान्सकडून ६ लाख ९५ हजारांचे कर्ज घेतले होते, अशी माहिती त्यांचा मुलाने दिली असल्याची पोलिसांनी सांगितले. उत्तम काळे यांच्या मृत्यूची नोंद हिंगाेली ग्रामीण पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.