तीन महिन्यांत मालवाहतुकीतून साडेचार लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:22 AM2021-05-28T04:22:52+5:302021-05-28T04:22:52+5:30
हिंगोली : कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आल्याने एसटी महामंडळाला मोठे नुकसान सहन करावे लागले. मात्र मालवाहतुकीतून तीन ...
हिंगोली : कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आल्याने एसटी महामंडळाला मोठे नुकसान सहन करावे लागले. मात्र मालवाहतुकीतून तीन महिन्यांत ४ लाख २२ हजार ३९१ रुपयांचे उत्पन्न हाती आले आहे. सर्व बाजारपेठ ठप्प असताना, इतर आगाराच्या तुलनेत हिंगोली आगाराने चांगली कामगिरी केली आहे.
कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. याचा फटका ऑटोरिक्षा, खासगी बससेवा यासह एसटी महामंडळालाही बसला आहे. प्रवासी वाहतूकच ठप्प असल्याने महामंडळाच्या उत्पन्नाचे मार्ग बंद झाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारासह दैनंदिन खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न निर्माण होत आहेे. गतवर्षीपासून एसटी महामंडळाने मालवाहतूकही करण्याचा निर्णय घेतला. सध्या काही दिवसांपासून प्रवासी वाहतूक ठप्प असताना हिंगोली आगाराने पुन्हा मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागील तीन महिन्यांत हिंगोली आगाराला ८७ भाडे मिळाले. यातून ४ लाख २२ हजार ३९१ रुपयांचे उत्पन्न मिळविले. यात फेब्रुवारी महिन्यात ४१ भाडे आले होते. यातून १ लाख ९५ हजार ८७० रुपयांचे उत्पन्न मिळाले. यासाठी २५०० किलोमीटरचे अंतर एसटीने कापले. मार्च महिन्यातही २० भाड्यातून १ लाख ८४९ रुपयांचे उत्पन्न हाती आले. यासाठी २ हजार १७६ किलोमीटर एसटी धावली. मे महिन्यात आतापर्यंत मिळालेल्या २६ भाड्यातून १ लाख २५ हजार ६७२ रुपयांचे उत्पन्न मिळाले. यासाठी २ हजार ६७८ किलोमीटर मालवाहतूक एसटी धावली. एकीकडे प्रवासी वाहतूक ठप्प असताना हिंगोली आगाराने मात्र मालवाहतुकीतून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला. इतर आगारांपेक्षा हिंगोली आगाराने योग्य नियोजन करीत मालवाहतुकीतून चांगले उत्पन्न मिळविले आहे.
हिंगोली आगाराकडे मालवाहतुकीसाठी ८ वाहने
हिंगोली आगाराकडे मालवाहतूक करण्यासाठी ८ वाहने तयार केली आहेत. एका वाहनातून एकावेळी १० टन मालाची वाहतूक करता येते. माल सुरक्षित राहत असल्याने व्यापाऱ्याचा कलही एसटीच्या मालवाहतूक वाहन वापरण्याकडे वाढला आहे. १०० किलाेमीटर अंतरासाठी ४६ रुपये, १०० ते २५० किलोमीटर अंतरासाठी ४४ रुपये, तर २५० च्या पुढील अंतरासाठी ४३ रुपये प्रती किलोमीटरप्रमाणे दर आकारला जात असल्याची माहिती हिंगोली आगाराचे विजय खंदारे यांनी दिली.
मालाची आयात जास्त, निर्यात कमी
हिंगोली जिल्ह्यात मोठे उद्योग, व्यवसाय नसल्याने मालाची निर्यात अत्यंत कमी प्रमाणात होते. इतर मोठ्या जिल्ह्यांतूनच विविध वस्तू आयात कराव्या लागतात. जिल्ह्यातून केवळ शेतमाल तेवढा इतर जिल्ह्यात पाठविला जातो. त्यामुळे एसटी आगाराला भाडे मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. इतर जिल्ह्यांतील आगाराचे ८ ते १० वाहने माल घेऊन हिंगोली जिल्ह्यात येतात.