घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी फिरते कृत्रिम तलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:34 AM2021-09-14T04:34:45+5:302021-09-14T04:34:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : शहरात सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी मिरवणुकीची परवानगी देण्यात आलेली नाही तसेच घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी फिरत्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरात सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी मिरवणुकीची परवानगी देण्यात आलेली नाही तसेच घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी फिरत्या वाहनांमध्ये कृत्रिम तलाव तयार केले असून, कयाधू नदी, जलेश्वर तलाव व सिरेकशहा बाबा तलाव याठिकाणीच सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी केले आहे.
हिंगोली शहरासह जिल्हाभरात ९८० ठिकाणी गणेशमूर्तींची स्थापना झाली आहे. यामध्ये २८६ ठिकाणी ‘एक गाव, एक गणपती’ स्थापन संकल्पना राबविण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे.
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्यासह पालिकेच्या पथकाने विसर्जन मार्गाची तसेच तलावांची पाहणी केली. यासंदर्भात पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी गणेश मंडळांना आवाहनही केले आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी कयाधू नदी, जलेश्वर तलाव तसेच सिरेकशहा बाबा तलाव याठिकाणी गणेशमूर्तीचे विसर्जन करावे. यासोबतच घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी पालिका प्रशासनाच्या मदतीने फिरत्या वाहनांमध्ये कृत्रिम तलाव तयार केले आहेत. तीन वाहनांमधून अशाप्रकारचे कृत्रिम तलाव केले असून, ही वाहने शहरात सर्व प्रभागांमध्ये फिरणार आहेत. याठिकाणीच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नसल्यामुळे गणेश मंडळांनी गर्दी होईल, अशा कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये, कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीला परवानगी नाही. मिरवणूक काढल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. किरकोळ विक्रेत्यांनीही वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात, चोरांपासून सावध राहावे, संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती निदर्शनाला आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिला आहे.